पुणे: अबेदा इनामदार महाविद्यालयाला १० लाखांचा दंड; मुरुड जंजिरा दुर्घटना: १४ विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणी कारवाईचा आदेश ९ वर्षांच्या संघर्षानंतर पालकांना न्याय

IMG_20250125_135913.jpg

अबेदा इनामदार महाविद्यालयाच्या मुरुड-जंजिरा सहल दुर्घटनेप्रकरणी ९ वर्षांनंतर विद्यापीठाचा मोठा निर्णय

पुणे: फेब्रुवारी २०१६ मध्ये मुरुड-जंजिरा काशिद समुद्रकिनारी घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेत अबेदा इनामदार महाविद्यालयातील तब्बल १४ विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. या घटनेनंतर तब्बल ९ वर्षांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने संबंधित महाविद्यालयावर कारवाई करत दहा लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. “दैनिक सिविक” मिरर ने दिलेल्या उर्तानुसार, हा निर्णय विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला.

घटना आणि त्यानंतरची कारवाई

२०१६ मध्ये पुण्यातील महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी संचालित अबेदा इनामदार महाविद्यालयातील विद्यार्थी काशिद समुद्रकिनारी सहलीसाठी गेले होते. सायंकाळी भरती-ओहोटीचा अंदाज न आल्याने १४ विद्यार्थी बुडाले आणि मृत्युमुखी पडले. या घटनेने मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता.

घटनेनंतर विद्यापीठाने समिती स्थापन करून महाविद्यालयावर कारवाईचे निर्देश दिले होते. मात्र, संबंधित महाविद्यालयाने २०१९ मध्ये राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाकडे अपील दाखल केले. अपील प्रक्रियेत कोणताही स्पष्ट निर्णय झालेला नसतानाही विद्यापीठ प्रशासनाने तत्काळ कारवाई केली नाही, अशी पालकांची तक्रार आहे.

पालकांचा न्यायासाठी संघर्ष

या दुर्घटनेतील मृत विद्यार्थ्यांच्या पालकांनी महाविद्यालय प्रशासन आणि संबंधित शिक्षकांवर कारवाईसाठी सातत्याने पत्रव्यवहार केला. अखेर ९ वर्षांनी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने महाविद्यालयाला दोषी ठरवत दहा लाख रुपयांचा दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे.

विद्यापीठाच्या निर्णयावर समाधान

विद्यापीठाच्या या निर्णयावर मृत विद्यार्थ्यांच्या पालकांनी काहीसे समाधान व्यक्त केले आहे. “नऊ वर्षांच्या संघर्षानंतर आता विद्यापीठाने न्याय देण्यासाठी पावले उचलली आहेत. दोषींवर आणखी कठोर कारवाई व्हावी,” अशी मागणी मृत विद्यार्थ्यांचे पालक शिवाजी सलगर यांनी केली.

विद्यापीठाचा इशारा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. देविदास वायदंडे म्हणाले, “विद्यापीठाच्या निर्णयाची पूर्तता झाली नाही, तर पुढील कठोर पावले उचलण्यात येतील.”

महाविद्यालयाकडून प्रतिक्रिया मिळालेली नाही

या प्रकरणी महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पी. ए. इनामदार यांची प्रतिक्रिया मिळवण्यासाठी प्रयत्न झाले, मात्र संपर्क होऊ शकला नाही.

Spread the love