पुणे: प्रायव्हेट’ पार्टी, पण धिंगाणा ‘पब्लिक’!
कोरेगाव पार्कमध्ये पेड पार्टीचा रात्रभर गोंधळ
पुणे, दि. २ (प्रतिनिधी)
कोरेगाव पार्कसारख्या ‘उच्चभ्रू’ परिसरात नववर्षाचं स्वागत थाटात करायचं ठरवलं, की कायद्यालाही सुट्टी द्यायची—असाच काहीसा समज एका २२ वर्षीय तरुणाने करून घेतल्याचे चित्र समोर आले आहे. ‘थर्टी फर्स्ट’च्या नावाखाली एका निवासी सोसायटीतील फ्लॅटमध्ये रात्रभर सुरू असलेली अवैध ‘पेड पार्टी’ अखेर उत्पादन शुल्क विभागाच्या छाप्यात उघडकीस आली आणि उच्चभ्रू परिसरातील ‘सुसंस्कृत’ शांततेला मोठा धक्का बसला.
कोरेगाव पार्क परिसरातील लिबर्टी सोसायटीतील ‘ओ’ इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये ही पार्टी सुरू होती. सोशल मीडियावरून “प्रायव्हेट पार्टी” म्हणून जाहिरात, प्रवेशासाठी ८०० रुपयांचं तिकीट, बंद दरवाजामागे मद्यपान आणि पाश्चात्त्य संगीतावर जल्लोष—हे सगळं पहाटेपर्यंत सुरू होतं. विशेष म्हणजे, पार्टी रात्री साडेदहा वाजता सुरू होऊन दुसऱ्या दिवशी तब्बल ११ वाजेपर्यंत चालू होती. नववर्षाचं स्वागत की शेजाऱ्यांच्या सहनशीलतेची परीक्षा, असा सवाल उपस्थित होत आहे.
इंस्टाग्राम-फेसबुकच्या मदतीने तरुणांना आकर्षित करत, अल्पवयीन सहकाऱ्याच्या सहाय्याने पार्टीचं नेटवर्क उभं केल्याचं समोर आलं आहे. ‘डिजिटल इंडिया’त अवैध धंदेही आता ऑनलाईन झाले आहेत का, असा टोमणाही यानिमित्ताने मारला जात आहे.
माहिती मिळताच उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकत तब्बल ७९ जणांना ताब्यात घेतले. आयोजक ओम रवींद्र भावकर (वय २२, रा. खराडी) याच्यासह पार्टीत सहभागी तरुण-तरुणींना वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात नेण्यात आले. छाप्यात विदेशी मद्य, बिअर, मोठ्या आवाजाची म्युझिक सिस्टीम, साठवणुकीचे साहित्य असा सुमारे ३३ हजार ५०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
निवासी सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये चोरी-छुप्या पद्धतीने, विनापरवाना अशा ‘पेड पार्टी’ सुरू असतात, हे सर्वश्रुत असतानाही त्या वेळेवर कारवाई का होत नाही, हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कोरेगाव पार्कमध्ये हे शक्य असेल, तर इतर भागांत काय सुरू असेल, अशी शंका नागरिक व्यक्त करत आहेत.
एकूणच, “प्रायव्हेट पार्टीच्या नावाखाली पब्लिक कायद्याची पायमल्ली” हा प्रकार थर्टी फर्स्टपुरताच मर्यादित राहतो की वर्षभर सुरू असतो, याकडे आता प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.