पुणे: येरवडा येथे ४० दिवसांच्या बालिकेची साडेतीन लाखांत विक्री; लालसेपोटी आई-वडिलांचा अमानुष कृत्य

पुणे, प्रतिनिधी | पैशाच्या हव्यासापोटी जन्मदात्यांनीच आपल्या अवघ्या ४० दिवसांच्या चिमुकलीची साडेतीन लाख रुपयांत विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकाराची माहिती मिळताच येरवडा पोलिसांनी तातडीने कारवाई करत आई-वडिलांसह मध्यस्थ आणि बालिका खरेदी करणाऱ्या महिलेवर कारवाई करत सहा जणांना अटक केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण पुणे शहरात संतापाची लाट उसळली आहे.
याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची नावे अशी – मीनल ओंकार सपकाळ (३०), ओंकार औदुंबर सपकाळ (२९), दोघेही रा. बिबवेवाडी, पुणे, साहिल अफजल बागवान (२७, रा. सातारा), रेश्मा शंकर पानसरे (३४, रा. येरवडा), सचिन रामा अवताडे (४४, रा. येरवडा) आणि दीपाली विकास फटांगरे (३२, रा. संगमनेर). या सर्वांविरोधात बाल न्याय (काळजी व संरक्षण) अधिनियम तसेच विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलगी विक्रीची योजना आणि पोलिसांकडून उघड
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मीनल सपकाळ ही पहिल्या पतीपासून विभक्त आहे आणि सध्या ओंकार सपकाळसोबत राहते. २५ जून रोजी तिने एका मुलीला जन्म दिला. त्यानंतर साहिल बागवान, रेश्मा पानसरे व सचिन अवताडे या मध्यस्थांनी मीनलशी संपर्क साधला. त्यांनी ही मुलगी दीपाली फटांगरेला देण्याची योजना आखली. बदल्यात दीपालीकडून साडेतीन लाख रुपयांची ऑफर देण्यात आली. त्यातील दोन लाख रुपये सपकाळ दांपत्याला देण्यात आले.
पैशावरून वाद, आणि खोटी तक्रार पोलिसात
या व्यवहारानंतर दीपाली फटांगरेने मध्यस्थांना अधिक रक्कम दिल्याचा संशय सपकाळ दांपत्याला आला. त्यामुळे त्यांच्यात वाद निर्माण झाला आणि अखेर ओंकार सपकाळ याने येरवडा पोलिस ठाणे गाठून मुलगी चोरीला गेल्याची तक्रार दिली. मात्र पोलिसांनी सखोल चौकशी केली असता, हा सारा प्रकार उघडकीस आला. फटांगरेने कायदेशीर दत्तक प्रक्रिया न पार पाडता मुलगी विकत घेतल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांचा पुढील तपास सुरू
याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र शेळके यांनी सांगितले की, सुरुवातीला मुलगी चोरीची केस दाखल झाली होती. मात्र तपासादरम्यान सत्य समोर आलं आणि या प्रकारात पोलिस स्वतः फिर्यादी झाले. पोलिस आता या टोळीने यापूर्वीही अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का, याचा तपास करत आहेत.
दरम्यान, पुण्यात गेल्या काही दिवसांत बालचोरीच्या घटना वाढत असून, या पार्श्वभूमीवर हा प्रकार अधिकच गंभीर मानला जात आहे. पोलिसांनी संबंधित बालिकेला तातडीने ताब्यात घेऊन बालक संरक्षण संस्थेकडे सुपूर्द केले असून तिची योग्य ती काळजी घेतली जात आहे.
—