पुणे: नॅक मूल्यांकन न करणाऱ्या २७ महाविद्यालयांवर प्रवेशबंदीची टांगती तलवार

पुणे : उच्च शिक्षणाची गुणवत्ता तपासण्यासाठी असलेली राष्ट्रीय मूल्यांकन व प्रमाणन परिषदेची (नॅक) प्रक्रिया टाळणाऱ्या महाविद्यालयांवर आता कारवाईची झडती सुरू झाली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संलग्नता विभागाने स्पष्ट इशारा दिला आहे की, २०२५-२६ शैक्षणिक वर्षात अशी महाविद्यालये प्रथम वर्ष प्रवेशापासून वंचित राहतील.
अधिसभा सदस्य डॉ. योगेश भोळे यांनी थेट प्रश्न केला की –
“विद्यापीठाशी संलग्न किती महाविद्यालयांना अजूनही नॅक मान्यता नाही?”
“मान्यता न घेणाऱ्यांवर कारवाई नेमकी कोणती?”
या प्रश्नांवर विद्यापीठाने मान्य केले की बहुतांश संस्थांनी प्रक्रिया पूर्ण केली आहे; पण पात्र असतानाही तब्बल २७ महाविद्यालयांनी नॅकची पहिली पायरीसुद्धा गाठलेली नाही.
“विद्यापीठाने निधी दिला, तज्ञांकडून मार्गदर्शन झाले, समित्या भेट देतात, तरीही ही महाविद्यालये नॅक टाळतात म्हणजे शिक्षणाची गुणवत्ता न तपासता प्रवेशातून पैसे कमविण्याचाच डाव दिसतो,” अशी टीका शिक्षण क्षेत्रातून सुरू झाली आहे.
विद्यापीठाने आता तलवार उगारली आहे – नॅक न केले तर प्रवेश नाही! व्यावसायिक, अव्यावसायिक, शासकीय, अशासकीय, अनुदानित, विनाअनुदानित अशा कोणत्याही गटातील महाविद्यालयांना सूट नाही.
शैक्षणिक वर्तुळात प्रश्न उपस्थित होतोय –
विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या या महाविद्यालयांना प्रवेशबंदी उशिरा का होईना पण योग्य धडा ठरेल का?
की पुन्हा राजकीय दबावाखाली यांना मोकळे रान दिले जाणार?
नॅक मूल्यांकन न करणाऱ्या महाविद्यालयांवरची ही कारवाई गुणवत्ता विरुद्ध बेफिकीरी अशा चिरंतन वादाला नव्याने पेटवणारी ठरली आहे.
—