पुणे: कमला नेहरू रुग्णालयात २५ तज्ज्ञ डॉक्टरांची तातडीने भरती; पगारात दुपटीने वाढ
पुणे – महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या कमतरतेवर तोडगा म्हणून महापालिका प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. कमी पगारामुळे येथे डॉक्टर नोकरीसाठी येत नसल्याची तक्रार वारंवार होत होती. यावर उपाय म्हणून सव्वा लाख रुपयांवरून थेट अडीच लाख रुपये मासिक मानधन करण्याचा निर्णय आयुक्त नवल किशोर राम यांनी घेतला असून २५ तज्ज्ञ डॉक्टरांची तातडीने भरती प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.
कमला नेहरू हे महापालिकेचे सर्वात मोठे रुग्णालय असून भव्य इमारती असली तरी तज्ज्ञ डॉक्टरांच्या अभावामुळे अनेक उपचार उपलब्ध नव्हते. त्यामुळे रुग्णांना ससून रुग्णालयात पाठवावे लागत होते. काही दिवसांपूर्वी आयुक्तांनी रुग्णालयाची पाहणी केली असता रुग्णांना दर्जेदार सेवा न मिळाल्याचे समोर आले. कमी पगारामुळे अनेक डॉक्टर सेवेतून बाहेर पडत असल्याची बाबही अधोरेखित झाली.
या परिस्थितीवर मात करण्यासाठी महापालिकेने पहिल्या टप्प्यात १३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. यानंतर शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत रुग्णालय दुरुस्तीसाठी आणखी ४२ कोटी रुपयांची तरतूद मंजूर करण्यात आली.
“महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये येणारे रुग्ण हे गरीब व गरजू असतात. दर्जेदार व परवडणारी आरोग्यसेवा देणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. कमला नेहरू रुग्णालयात व्यापक सुधारणा सुरू असून २५ तज्ज्ञ डॉक्टरांची भरती तातडीने केली जाणार आहे,”
— नवल किशोर राम, आयुक्त, पुणे महापालिका