Pune: सतर्क पोलिसांची तत्परता; हरवलेली दीड लाख रुपये किमतीची पिशवी परत मिळवून दिली

पुणे – पुणे ते कोल्हापूर प्रवास करून परतलेल्या कोथरूड येथील एका वयोवृद्ध महिलेला पोलिसांच्या तत्परतेमुळे हरवलेली दीड लाख रुपये किमतीची रोख रक्कम व चांदीचे दागिने परत मिळाले. या प्रामाणिक व चौकस कारवाईमुळे पुणे पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सुगंधा मारुती खेरवर्डेकर ( ५५, रा. जय भवानी नगर, कोथरूड) या आज पहाटे २.३० वाजता कोल्हापूरहून लक्झरी बसने पुण्यातील स्वारगेट मेट्रो स्थानकात उतरल्या. उतरल्यानंतर त्यांना आपल्या सामानातील एक महत्त्वाची पिशवी, ज्यामध्ये अंदाजे दीड लाख रुपयांची रोख रक्कम व चांदीचे दागिने होते, एका रिक्षात विसरल्याचे लक्षात आले.
त्यानंतर खेरवर्डेकर यांनी त्वरित जवळील स्टेडियम पोलीस चौकीत संपर्क साधला. चौकीतील पोलिस कर्मचारी सागर आनंद काळे, मार्शल विनोद साळवी व नेताजी वसुदेव यांनी अत्यंत दक्षतेने आणि तत्परतेने कारवाई करत बस व आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले.
फुटेजच्या आधारे संबंधित रिक्षाचा शोध घेण्यात आला आणि काही तासांच्या प्रयत्नांनंतर सदर पिशवी सुरक्षितरित्या शोधून काढण्यात आली. संबंधित रिक्षाचालकाची ओळख पटवून त्याच्याकडून पिशवीसह रोख रक्कम व दागिने महिलेच्या ताब्यात देण्यात आले. या संपूर्ण प्रामाणिक आणि उत्कृष्ट कार्यासाठी खेरवर्डेकर यांनी पुणे पोलिसांचे मन:पूर्वक आभार मानले आहेत.