पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुण्यात सभा; कडक सुरक्षा बंदोबस्तामुळे वाहतूक कोंडी, नागरिक त्रस्त
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी स. प. महाविद्यालयाच्या प्रांगणात प्रचारसभा मोठ्या गर्दीत पार पडली. या सभेसाठी शहरात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती, मात्र यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेला मोठा फटका बसला.
सभेपूर्वीच सोमवारी सायंकाळी जंगली महाराज रस्ता आणि टिळक रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. यामुळे मध्यवर्ती भागात वाहतूक कोंडी झाली होती. मंगळवारी प्रत्यक्ष सभेच्या दिवशी दुपारपासूनच प्रमुख रस्ते बंद करण्यात आले आणि रस्त्यांवर वाहने उभी करण्यास बंदी घालण्यात आली. परिणामी गल्लीबोळांमध्येही वाहतूक कोंडी निर्माण झाली. सोलापूर रस्ता, सातारा रस्ता या प्रमुख मार्गांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त शहरात कठोर बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यांचा ताफा ज्या मार्गावरून जाणार होता, त्या मार्गावर सोमवारी सायंकाळी रंगीत तालीम घेण्यात आली. यावेळी जंगली महाराज रस्ता, टिळक रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले. परिणामी कार्यालयातून घरी जाणारे नागरिक वाहतूक कोंडीत अडकले होते.
मंगळवारी देखील कार्यालय सुटण्याच्या वेळेस रस्ते बंद असल्याने जंगली महाराज रस्ता, घोले रस्ता, आपटे रस्ता परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली. त्याचप्रमाणे, सदाशिव पेठ, शास्त्री रस्ता आणि टिळक रस्ता परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली.
स. प. महाविद्यालय परिसरात छावणीसारखी स्थिती होती. पोलिसांसह केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांनी परिसरात कडक बंदोबस्त ठेवला होता. सभा संपल्यानंतरही पीएमपी प्रवासी व इतर वाहनचालक तासभर कोंडीत अडकले होते.
शहरातील या कोंडीमुळे पुणेकरांना सलग दोन दिवस वाहतुकीच्या समस्येला सामोरे जावे लागले, ज्यामुळे अनेक नागरिकांनी मनस्ताप व्यक्त केला.