फिल्ड आर्चरीत पूना ज्युनिअर कॉलेजचा झेंडा रोवला; शकेब सय्यदची राष्ट्रीय स्तरावर दमदार झेप
पूना ज्युनिअर कॉलेज येथील इयत्ता बारावी (वाणिज्य शाखा) चा विद्यार्थी शकेब सय्यद याने फिल्ड आर्चरी स्पर्धांमध्ये टप्प्याटप्प्याने घवघवीत यश संपादन करून महाविद्यालयाच्या क्रीडा परंपरेत मानाचा शिरपेच रोवला आहे.
सर्वप्रथम जिल्हास्तरीय फिल्ड आर्चरी अजिंक्यपद स्पर्धेत शकेबने उत्कृष्ट अचूकता व संयमाचे प्रदर्शन करत रौप्य पदक पटकावले. या यशामुळे त्याची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली.
त्यानंतर विभागीय स्तरावरील फिल्ड आर्चरी अजिंक्यपद स्पर्धेत शकेबने आणखी दमदार कामगिरी करत सुवर्ण पदक जिंकले. या यशस्वी कामगिरीच्या जोरावर त्याने राज्यस्तरीय स्पर्धेत प्रवेश मिळवला.
FIELD ARCHERY ASSOCIATION OF INDIA, TAFISA व WORLD ANTI-DOPING AGENCY यांच्या मान्यतेखाली फिल्ड आर्चरी असोसिएशन ऑफ पालघर जिल्हा (आयोजक) व फिल्ड आर्चरी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (नियोजक) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १५ वी राज्यस्तरीय फिल्ड इनडोअर आर्चरी स्पर्धा २०२५–२६
दि. २७ व २८ डिसेंबर २०२५ रोजी
स्थळ : व.वि.रा.म.न.पा. खुला मैदान, नातवशीपाडा, पालघर
येथे यशस्वीरीत्या पार पडली.
या राज्यस्तरीय स्पर्धेत शकेब सय्यद याने उत्कृष्ट तांत्रिक कौशल्य, अचूक नेमबाजी व मानसिक स्थैर्य दाखवत एक सुवर्ण व एक रौप्य पदक पटकावले. या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर त्याची राष्ट्रीय स्तरावरील फिल्ड आर्चरी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
शकेबच्या या यशामागे मार्गदर्शक व प्रशिक्षक इम्रान पठाण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यांच्या शिस्तबद्ध प्रशिक्षण, योग्य नियोजन व सातत्यपूर्ण प्रेरणेमुळेच ही यशस्वी वाटचाल शक्य झाल्याचे नमूद करण्यात आले.
या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. निसार आय. पटेल, सचिव श्री. हानी ए. फरीद, विश्वस्त श्री. हनीफ लकडावाला, पूना कॉलेजचे प्राचार्य डॉ. इक्बाल शेख, ज्युनिअर कॉलेजचे उप-प्राचार्य इम्तियाज आगा, पर्यवेक्षक नसीम खान, जिमखाना विभागप्रमुख (HOD) डॉ. अय्याज शेख, क्रीडा शिक्षक अशद शेख, तसेच क्रीडा शिक्षक इम्रान पठाण व इतर कर्मचारीवर्ग यांनी शकेब सय्यदचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
पूना ज्युनिअर कॉलेज परिवारातर्फे शकेबला आगामी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.