पिंपरी-चिंचवडमध्ये पोलीस उपनिरीक्षक लाच घेताना रंगेहाथ अडकला; एसीबीची कारवाई

पिंपरी-चिंचवड : पिंपरी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षकास तब्बल 30 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी, 15 एप्रिल 2025 रोजी करण्यात आली.
निलेश बोकेफोडे (वय 38), पद – पोलीस उपनिरीक्षक, पिंपरी पोलीस स्टेशन, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय, पुणे असे अटकेत आलेल्या उपनिरीक्षकाचे नाव आहे. एका 24 वर्षीय युवकाने एसीबीकडे याबाबत तक्रार दिली होती.
तक्रारदाराच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी व गुन्ह्यात जप्त करण्यात आलेले वाहन सोडविण्याच्या मोबदल्यात उपनिरीक्षक बोकेफोडे यांनी 40 हजार रुपयांची लाच मागितल्याचे समोर आले. तडजोडीनंतर ही रक्कम 30 हजारांवर आली. तक्रारीनंतर 11 व 12 एप्रिल रोजी एसीबीने पडताळणी केली. त्यानंतर 15 एप्रिल रोजी पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहन नगर पोलीस चौकी येथे बोकेफोडे यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली.
या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 च्या कलम 7 अन्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदर कारवाई एसीबी पुणे परिक्षेत्राचे पोलीस उप आयुक्त शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून तपास पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर करत आहेत.
जनतेसाठी महत्त्वाचे आवाहन :
सरकारी अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने एखादा एजंट जर कोणत्याही शासकीय कामासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करत असेल, तर नागरिकांनी तात्काळ खालील माध्यमांतून एसीबीशी संपर्क साधावा:
- दुरध्वनी क्रमांक : 020 26122134 / 26132802 / 26050423
- व्हॉट्स अॅप : 9930997700 (मुंबई)
- ई-मेल : dyspacbpune@mahapolice.gov.in
- वेबसाईट : www.acbmaharashtra.gov.in
- ऑनलाईन अॅप तक्रार : www.acbmaharashtra.net.in
—