…जो कोणी आडवं येईल त्याला उचला: अजित पवार

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (सोमवारी) पहाटे सहा वाजल्यापासून हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाहतूक आणि रस्त्यांशी संबंधित समस्यांचा आढावा घेतला. या पाहणी दौऱ्यात त्यांनी रस्ते अडवणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली असून, अशा व्यक्तींविरोधात थेट भारतीय दंड विधान कलम 353 अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.
हिंजवडी परिसरातील नागरिकांच्या तक्रारी, अपुऱ्या रस्त्यांची रुंदी, वाहतूक कोंडी, तसेच काही स्थानिकांकडून शासकीय रस्त्यांवर होणारे अडथळे – या सर्व समस्यांचा आढावा घेतल्यानंतर अजित पवार यांनी पीएमआरडीए व संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले.
“आता कोणाचंही ऐकू नका. चांगलं काम करा. सरकारी रस्त्यावर अडथळा आणणाऱ्यांवर कलम 353 अंतर्गत गुन्हे दाखल करा. जे आडवं येईल त्याला उचला. त्याशिवाय हे होणार नाही,” अशा शब्दांत अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.
ते पुढे म्हणाले, “ज्याच्या खाजगी मालमत्तेवर रस्ता जात असेल, त्याला मोबदला दिला जाईल. त्यांचे नुकसान करणे आपला उद्देश नाही. मात्र जो रस्ता आधीच शासकीय मालकीचा आहे, त्याबाबत कुणालाही मोबदला देण्याचा प्रश्नच येत नाही.”
रस्ते विकासासंदर्भातही त्यांनी ठाम भूमिका घेतली. “रस्ते छोटे ठेवू नका, मोठेच रस्ते करा. शक्य असल्यास फोर लेन रस्ते करा. हिंजवडीसारख्या आयटी हबमध्ये वाहतूक कोंडी असणं हे स्वीकारार्ह नाही,” असे ते म्हणाले.
अजित पवारांच्या या दौऱ्यामुळे प्रशासनाच्या हालचालींना वेग आला असून, आयटी पार्क परिसरातील रस्त्यांच्या कामांवर विशेष भर दिला जाणार आहे.
स्थानिकांच्या विरोधावर कायदेशीर कारवाईसाठी अधिकाऱ्यांना “कडक भूमिका घ्या” असा संदेश त्यांनी दिला आहे.
मुख्य मुद्दे:
हिंजवडी आयटी पार्क परिसरात अजित पवार यांचा सकाळी दौरा
सरकारी रस्त्यावर अडथळा आणणाऱ्यांविरोधात 353 कलमाखाली गुन्हे दाखल करण्याचे आदेश
खाजगी जमिनीवर रस्ता जात असल्यास मोबदल्याची हमी
रस्ते छोटेखानी न ठेवता मोठे व फोर लेन रस्त्यांचे नियोजन करण्याचे निर्देश
“जे आडवं येईल त्याला उचला,” असा खणखणीत इशारा
—