पुण्यात बनावट नंबर प्लेट लावून प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसवर आरटीओची कारवाई; बसमालकाकडून साडेदहा लाखांचा दंड वसूल

पुणे: टॅक्स, इन्शुरन्स आणि फिटनेस संपलेली असूनही बनावट नंबर प्लेट लावून प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) पथकाने कठोर कारवाई केली आहे. पथकाने संबंधित बस ताब्यात घेतली असून, वाहनमालकाविरोधात खटला दाखल करण्यात आला आहे.
साडेदहा लाखांची वसुली होणार
नियमभंगप्रकरणी वाहनधारकाला नोटीस देण्यात आली आहे. तसेच, या कारवाईदरम्यान बसमालकाकडून साडेदहा लाख रुपयांची वसुली करण्यात येणार असल्याचे आरटीओने स्पष्ट केले. संबंधित बसधारकाने शक्कल लढवत बसची मूळ नंबर प्लेट बदलून बनावट नंबर प्लेट वापरली होती.
दंडाचा प्रकार समोर आला कसा?
बनावट नंबर प्लेटमुळे या बसवरील दंड मूळ नंबर प्लेटच्या मालकाच्या नावावर जमा होत होता. काही दिवसांपूर्वी मूळ बसमालकाने परमिट नूतनीकरणासाठी आरटीओमध्ये संपर्क साधला असता त्यांच्या वाहनावर दंड दाखवण्यात आल्याचे उघड झाले. यावरून हा संपूर्ण प्रकार समोर आला.
आरटीओ पथकाची तडाखेबंद कारवाई
या प्रकरणी मोटार वाहन निरीक्षक ज्योती जाधव, पद्माकर विश्व, सहायक निरीक्षक सुकन्या काजवणे आणि नेहा बालसिंग यांच्या पथकाने तपासणी करून संबंधित बस जप्त केली. प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले आणि सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी विनायक साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
पुणे-मुंबई प्रवासी वाहतुकीसाठी वापर
सदर बस पुणे-मुंबई प्रवासी वाहतुकीसाठी वापरली जात होती. टॅक्स, इन्शुरन्स आणि फिटनेस संपलेल्या अवस्थेत रस्त्यावर धावत असलेल्या या बसवर आता खटला दाखल करण्यात आला आहे. आरटीओच्या या धडक कारवाईमुळे वाहतूक नियम मोडणाऱ्यांना चांगलाच धडा मिळाला आहे.