‘फी’साठी मुजोर संस्थाचालकानं केलेल्या मारहाणीत पालकाचा मृत्यू, धक्कादायक घटनेनं परभणी हादरलं

n67212885817523042659912492ce7b247c4323f4b0b45a9cb30693b38b395de9653f858bfad14753a9bbf4.jpg

परभणी: राज्यात आजही अनेक शैक्षणिक संस्थाचालकांकडून पालकांचा छळ सुरु असल्याचे प्रकार घडत आहेत. विद्यार्थ्यांची टीसी मागितली तर उर्वरीत फी भरेपर्यंत टीसी दिली जात नाही.

त्यात मग दादागिरी केली जाते ,मारहाण होते. असाच प्रकार परभणीत घडला आहे. एक वारकरी संप्रदायाचा पालक आपल्या मुलीची टीसी काढण्यासाठी शाळेत गेले यावेळी उर्वरित फीससाठी चक्क संस्थाचालकाने पालकाला एवढी मारहाण केली की त्यात या पालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय.

फी साठी संस्थाचालकाची मुजोरी थेट पालकाच्या जीवावर उठली आहे. संस्थाचालकाने केलेल्या मारहाणीत पालकाचा जीव गेला आहे. याप्रकरणी संस्थाचालकावर परभणीच्या पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाणून घेऊयात संपूर्ण प्रकरण.

नेमका कसा घडला प्रकार?

परभणीच्या उखळद गावातील पल्लवी जगन्नाथ हेंडगे या विद्यार्थिनीचा प्रवेश अवघ्या काही दिवसांपूर्वी पूर्णा तालुक्यातील हट्टा येथे असलेल्या हायटेक निवासी शाळेत तिचे वडील जगन्नाथ हेंडगे यांनी तिसरीत केला होता. मात्र तिथे काही दिवस राहिल्यानंतर मला इथे नको म्हणत गावातील शाळेतच टाका असा तगादा तीन वर्षीय मुलीने पालकांकडे लावला होता. त्यावरून तिचे वडील जगन्नाथ हेंडगे हे आपल्या मुलीची टीसी काढण्यासाठी हायटेक शाळेत गेले असता तिथेच त्यांचा घात झाला. संस्थाचालक असलेल्या प्रभाकर चव्हाण यांना हेंडगे यांनी प्रवेश घेताना दिलेले पैसे मागितले. यावेळी चव्हाण यांनीही हेंडगे यांना तुम्हीच उर्वरित फी द्या अशी मागणी केली .यातूनच वाद झाला अन् संस्थाचालक असलेल्या प्रभाकर चव्हाण आणि त्यांच्या पत्नीने जगन्नाथ हेंडगे यांना बेदम मारहाण केली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे.

मुजोर संस्थाचालकावर कडक कारवाई करण्यात यावी

दरम्यान, घटना घडताच काल रात्री जगन्नाथ हेंडगे यांना तत्काळ परभणीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांचे शवविच्छेदन करुन त्यांच्यावर उखळद गावात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. दरम्यान विनाकारण बेदम मारहाण करुन जीव घेणाऱ्या मुजोर संस्थाचालकावर कडक कारवाई करण्यात यावी आणि संस्थाही बंद करण्यात यावी अशी मागणी जगन्नाथ हेंडगे यांच्या कुटुंबियांनी केली आहे. तर जगन्नाथ हेंडगे यांना केवळ 3 एकर जमीन आहे. या शेती करण्याबरोबरच ते अतिशय मनमिळाऊ आणि वारकरी संप्रदायाचा झेंडा हाथी घेवून सर्वत्र कीर्तन प्रवचन करत होते. त्यामुळे त्यांना महाराजही बोलले जायचे. त्यांना 2 मुली आणि एक मुलगा आहे. जगन्नाथ हेंडगे यांचा केवळ फिससाठी अशा पद्धतीने जीव घेण्यात आला आहे. यातील दोषी संस्थाचालकाला सरकारने सोडू नये, कठोर कारवाई करावी अशी मागणी गावकऱ्यांनी ही केलीय.

प्रकरणांमध्ये राजकीय दबाव येऊ नये

या प्रकरणात जगन्नाथ हेंडगे यांचे काका मुंजाजी हेंडगे यांच्या फिर्यादीवरुन पूर्णा पोलीस ठाण्यात हायटेक निवासी शाळेचे संस्थाचालक प्रभाकर चव्हाण आणि त्यांची पत्नी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या प्रथमतः दोघेच आरोपी आहेत. परंतू, इतर काही जण यात समाविष्ट आहेत का? याचा तपास पोलीस करणार आहेत. दरम्यान, हायटेक निवासी शाळेचा संस्थाचालक हा राजकीय व्यक्ती असल्यामुळे या प्रकरणांमध्ये राजकीय दबाव येऊन पोलीस कारवाईत दिरंगाई न होता केवळ फी साठीच पालकाचा जीव घेणाऱ्या या संस्थाचालकवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे.

Spread the love

You may have missed