महाविद्यालयांमध्ये ‘आपले सेवा केंद्र’; विद्यार्थ्यांना मिळणार दाखले महाविद्यालयातच

0
IMG_20250826_163540.jpg

पुणे : विद्यार्थ्यांना व पालकांना विविध शासकीय दाखल्यांसाठी सरकारी कार्यालयांत हेलपाटे मारण्याची वेळ आता टळणार आहे. लवकरच राज्यातील २०० हून अधिक महाविद्यालयांमध्ये ‘आपले सरकार सेवा केंद्र’ सुरू होणार असून, महत्त्वाचे दाखले थेट महाविद्यालयातच उपलब्ध होतील.

अहमदनगर जिल्ह्यातील १५ महाविद्यालयांमध्ये हा उपक्रम यशस्वी ठरल्यानंतर पुण्यासह इतर जिल्ह्यांमध्ये तो विस्तारला जात आहे. दरवर्षी शिष्यवृत्तीसाठी आवश्यक असलेले ‘नॉन-क्रिमी लेयर’ आणि उत्पन्नाचे दाखले मिळविताना विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. या सेवाकेंद्रांमुळे आता हा त्रास टळणार आहे.

या केंद्रांतून १७ सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार असून, दाखला घेण्यासाठी ५९ रुपये शुल्क आकारले जाईल. त्यापैकी ३२ रुपये केंद्र चालवणाऱ्या महाविद्यालयाला मिळणार असल्याने महाविद्यालयाच्या उत्पन्नातही भर पडेल. याशिवाय ‘कमवा आणि शिका’ योजनेतील विद्यार्थ्यांच्या मदतीने हे केंद्र चालवता येणार असल्याने शासनावरील आर्थिक भार काही प्रमाणात कमी होईल.

या उपक्रमासाठी जिल्हा प्रशासनाकडे महाविद्यालयांनी अर्ज करणे आवश्यक आहे. अर्जाला पालकमंत्र्यांची मान्यता मिळाल्यानंतर संबंधित माहिती ‘महा-आयटी’कडे पाठवली जाईल व त्यानंतर लॉग-इन आयडी व पासवर्ड देण्यात येईल.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात येत्या शुक्रवारी (ता. २९) आयोजित कार्यशाळेत मान्यताप्राप्त महाविद्यालयांच्या प्राचार्यांना या केंद्राबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे.

महत्त्वाचे मुद्दे

२०० हून अधिक महाविद्यालयांत सुरू होणार ‘आपले सरकार सेवा केंद्र’

१७ शासकीय सेवा महाविद्यालयातच उपलब्ध

दाखल्यासाठी ५९ रुपये शुल्क; त्यातील ३२ रुपये महाविद्यालयाला

‘कमवा आणि शिका’ योजनेतील विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी

शिष्यवृत्ती दाखले मिळविताना विद्यार्थ्यांचा त्रास होणार कमी



Spread the love

Leave a Reply