महापालिकेची यंत्रणा ढिसाळ; दोन आठवड्यांत ३ हजार तक्रारी, आयुक्तांचा कारभारात पारदर्शकतेचा निर्धार

0
IMG_20250624_125352.jpg

पुणे | प्रतिनिधी
पुणे महापालिकेतील प्रशासकीय यंत्रणा अद्यापही जुन्या पध्दतीनुसार कार्यरत असून, विकेंद्रीकरणाचे अधिकार असतानाही क्षेत्रीय कार्यालये नागरिकांच्या तक्रारी सोडवण्यात अपयशी ठरत असल्याची कबुली खुद्द महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली आहे. गेल्या दोन आठवड्यांत तब्बल ३ हजार तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्या वेळेत न सोडवल्यामुळे नागरिक मुख्यालयात येऊन त्रास सहन करत आहेत.

महापालिकेच्या विविध विभागांशी संवाद साधत आयुक्त राम यांनी सोमवारी कामकाजाचा सखोल आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी यंत्रणेमधील त्रुटींवर रोखठोक भाष्य करत तातडीने सुधारणा करण्याचा निर्धार व्यक्त केला.

कामकाजात कुचराई; जबाबदारी निश्चित करून कारवाईचा इशारा
“परिमंडळ उपायुक्त व सहायक आयुक्त यांच्याकडे भरपूर अधिकार असूनही त्यांच्याकडून कामात कुचराई होत आहे. त्यामुळे नागरिकांना मुख्यालयात धाव घ्यावी लागते,” असे स्पष्ट करत राम यांनी यापुढे जबाबदारी निश्चित करत आवश्यक ती कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला.

काम करणारे हजारो कर्मचारी, पण प्रत्यक्षात कुठेच नाहीत!
शहर स्वच्छ ठेवण्यासाठी १२ हजार कर्मचारी असूनही ते रस्त्यावर दिसत नाहीत, असा सवाल आयुक्तांनी उपस्थित केला. प्रत्येक ५०० मीटरवर कर्मचारी दिसायला हवा, मात्र वास्तव वेगळे आहे. विशेषतः झोपडपट्टी भागात कचरा उचलला जात नाही, यामागे संस्थांना वेळेवर पैसे न मिळणे हे एक प्रमुख कारण असल्याचेही ते म्हणाले.

महापालिका कामकाज ऑनलाईन करण्याचा निर्णय
महापालिकेची कार्यपद्धती ही कालबाह्य असून, आता सर्व प्रक्रिया ऑनलाईन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. “ऑनलाईन प्रणालीमुळे विभागांमध्ये सुसंवाद साधता येईल आणि कामचुकार कर्मचाऱ्यांचाही वेध घेता येईल,” असे त्यांनी नमूद केले.

पालिकेच्या कामात सुसुत्रता व पारदर्शकता येण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले
नागरिकांच्या समस्या तत्काळ सोडवणे, प्रशासन गतीमान करणे आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे या त्रिसूत्रीवर भर देत आयुक्तांनी पुणेकरांना उत्तम सेवा देण्याचा निर्धार व्यक्त केला.
———
मुख्य मुद्दे:

दोन आठवड्यांत ३ हजार तक्रारी

क्षेत्रीय कार्यालयांची कामगिरी अपुरी

१२ हजार स्वच्छता कर्मचारी, पण प्रत्यक्षात दिसत नाहीत

ऑनलाईन पद्धतीने कामकाज सुसुत्र करण्याचा निर्णय

कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा

Spread the love

Leave a Reply

You may have missed