हडपसर-मुंढवा परिसरात महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक कारवाई; हातगाड्या, स्टॉल्स, पथाऱ्या हटवून अनधिकृत अतिक्रमणावर घातली गदा

पुणे | प्रतिनिधी
हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील चिंतामणी नगर भाजी मंडई ते हांडेवाडी रस्त्यालगतच्या परिसरात अतिक्रमण निर्मूलन विभागाने धडक कारवाई करत अनेक अनधिकृत व्यावसायिकांचे अतिक्रमण हटवले. सदर कारवाईत एकूण ६ हातगाड्या, १ स्टॉल, २ स्टील शॉवरमा काउंटर, ४२ पथाऱ्या आणि अन्य १७ अतिक्रमणांची हटवणूक करण्यात आली.
ही कारवाई अतिक्रमण विभाग उपआयुक्त श्री. संदीप खलाटे आणि सहायक आयुक्त बाळासाहेब ढवळे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईसाठी महाराष्ट्र सुरक्षा बलाचे ५ जवान, २ पोलिस कर्मचारी, मध्यवर्ती भरारी पथक तसेच हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमण विभागातील अधिकारी व कर्मचारी, बिगारी सेवक यांच्यासह एकूण मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ आणि यंत्रणा कार्यरत होती.




अतिक्रमण निरीक्षक राकेश काची, सहायक निरीक्षक कुणाल मुंढे, साईनाथ निकम, अभिलाष कांबळे, वामन सुद्रिक, माधव बहिरम आणि भरारी पथकाचे सहाय्यक निरीक्षक राकेश सोनवणे, निशांत सावंत, तुषार कदम यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई यशस्वीपणे पार पडली. यावेळी ओपन ट्रॅक २ आणि पिंजरा वाहन १ चा वापर करण्यात आला.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, अशा प्रकारच्या अनधिकृत अतिक्रमणांवर नियमितपणे कारवाई करण्यात येणार असून सार्वजनिक रस्ते, फूटपाथ आणि मंडई परिसर मुक्त ठेवण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे.