महापालिकेचे दवाखाने ‘सलाइन’वर – रुग्णसेवा कोमात!

0
vsrsnews-pune-municipal.jpg

पुणे : महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेवर इतकी पाळी आली आहे की आता दवाखाने अक्षरशः सलाइनवर चालत आहेत. रोज हजारो रुग्ण रांगेत उभे, पण उपचारासाठी डॉक्टरांचा पत्ता नाही. महापालिकेच्या दवाखान्यांची अवस्था पाहिली, तर ही रुग्णसेवा आहे की ‘अर्धवट सेवा’? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

आरोग्य विभागातील एकूण १,७८३ पदांपैकी तब्बल ६३५ पदे रिक्त. त्यात डॉक्टरांच्या १४५ पदांपैकी तब्बल १०६ पदे रिक्त म्हणजे संपूर्ण शहराच्या आरोग्याची जबाबदारी फक्त ३९ डॉक्टरांच्या खांद्यावर! एवढं काम कुणीही देव करायला नाही म्हणेल. मग रुग्ण काय करणार – देवाघरं जाऊन प्रार्थना?

६० बाह्यरुग्ण विभाग, एक सामान्य रुग्णालय, संसर्गजन्य रुग्णालय आणि २१ प्रसूतिगृहे या सर्व यंत्रणा चालवायच्या – पण माणूस कुठून आणणार? तात्पुरते डॉक्टर व कर्मचारी नेमून महापालिका जुगाड करत आहे, पण साथरोग, गर्दी आणि मोफत उपचारासाठी वाढता ओघ यात हा ‘जुगाड’ फसतोच.

कर्मचारी संघटना आणि सामाजिक संस्था ओरडून ओरडून घसा बसवून म्हणत आहेत – “रिक्त पदे भरा, नाहीतर रुग्णांचा बळी जाईल.” पण महापालिकेची भरती प्रक्रिया एवढी ‘धीम्या गतीची’ की, वाटतंय रुग्ण आधी गेला तरीही फाइल पोहोचणार नाही.

संवर्गनिहाय उणीव :

वर्ग १ : १४५ पैकी १०६ रिक्त (फक्त ३९ कार्यरत)

वर्ग २ : २६८ पैकी ८५ रिक्त

वर्ग ३ : ७५५ पैकी २२१ रिक्त

वर्ग ४ : ६१५ पैकी २२३ रिक्त


एकूण : १७८३ पदांपैकी ६३५ रिक्त!

दरम्यान, आरोग्य विभागप्रमुख डॉ. निना बोराडे म्हणाल्या, “पगाराच्या कमतरतेमुळे डॉक्टर येत नाहीत. भरती प्रक्रिया सुरू आहे.” – म्हणजे रुग्णाला सांगितलं की, “तुमच्या आजाराचंही पॅकेज कमी आहे, थांबा, प्रक्रिया सुरू आहे.”

महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेवर आता खरंच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. दवाखान्यांची अवस्था पाहून नागरिकांचा संताप एकच – “ही सेवा नाही, ही सजा आहे!”


Spread the love

Leave a Reply

You may have missed