खासदार सुप्रिया सुळे, कंगना रणौत अन् महुआ मोईत्रा यांचा एकत्र डान्स, व्हिडीओ तुफान व्हायरल
नवी दिल्ली :
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, भारतीय जनता पक्षाच्या खासदार कंगना रणौत आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी एकत्र दिलखुलास डान्स केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. भाजप खासदार नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्न सोहळ्यातील हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.
अलिकडच्या काही दिवसांपूर्वी या तिन्ही खासदारांनी नृत्याची तालीम करतानाचा एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोवर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतर आता प्रत्यक्ष डान्सचा व्हिडीओ समोर आल्यानं चर्चेला आणखी उधाण आलं आहे.
व्हिडीओत काय दिसतं?
ओम शांती ओम चित्रपटातील एका लोकप्रिय गाण्यावर सुप्रिया सुळे, कंगना रणौत आणि महुआ मोईत्रा या तिन्ही खासदारांनी एकत्र नृत्य सादर केले. व्यासपीठाच्या मध्यभागी खासदार नवीन जिंदाल हेही सहभागी झाल्याचं दिसत आहे. कार्यक्रमातील रंगत आणि उत्साह पाहून पाहुण्यांनीही दिलखुलास प्रतिसाद दिला.
पहा व्हिडिओ
काही दिवसांपूर्वी कंगना रणौत यांनी नृत्याची तालीम सुरू असल्याचा फोटो शेअर केला होता. “सहकारी खासदारांसोबत सिनेमातील क्षण अनुभवले,” असा कॅप्शन देत त्यांनी सरावाचे क्षणही लोकांसमोर आणले होते. आता त्या सरावाचा परिणाम म्हणून तिन्ही खासदारांचा तालबद्ध डान्स पाहायला मिळत आहे.
वेड लावणारी चर्चा
नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नाची संगीत समारंभातील ही खासदारांची परफॉर्मन्स सोशल मीडियावर ट्रेंडिंग ठरली आहे. राजकीय मतभेद विसरून एकत्र दिलेला हा सांस्कृतिक परफॉर्मन्स नेटिझन्सला भावला आहे. काहींनी प्रशंसा केली तर काहींनी विनोदी प्रतिक्रिया दिल्या, पण व्हिडीओने सर्वत्र लक्ष वेधून घेतले आहे.
—