राज्यात मध्यम पावसाचा अंदाज; १ सप्टेंबरपासून पावसाचा जोर वाढणार – वाचा सविस्तर

0

पुणे : राज्यातील हवामानामध्ये गेल्या २४ ते ४८ तासांपासून मोठा बदल पाहायला मिळाला आहे. सध्या राज्यात पावसाचा जोर कमी झाला असून, आगामी दोन दिवसांमध्ये राज्यात मध्यम पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १ सप्टेंबरपासून पावसाचा जोर पुन्हा वाढणार असून, १२ सप्टेंबरपर्यंत राज्यात सर्वत्र धो-धो पावसाचा अंदाज आहे.

गुरुवारी आणि शुक्रवारी राज्यात मोठ्या पावसासाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केले गेलेले नाहीत, त्यामुळे या दोन दिवसांत राज्यभर मध्यम पावसाची शक्यता आहे. मात्र, सप्टेंबर महिन्यात सलग बारा दिवस पावसाचा जोर कायम राहील, असे अनुमान आहे.

पानशेतसह चारही धरण क्षेत्रांमध्ये बुधवारी सकाळपासून पावसाचा जोर कमी झाल्याने ऊन्हाचा आभास झाला आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून विसर्ग कमी करण्यात आला आहे. सध्या खडकवासलातून मुठा नदीत केवळ ४०७० क्युसेकने पाणी सोडले जात आहे. बुधवारी संध्याकाळी ५ वाजता खडकवासला धरणामध्ये २८.२३ टीएमसी म्हणजे ९६.८३ टक्के साठा नोंदवला गेला.

रायगड जिल्ह्यातील पानशेत, वरसगाव धरणक्षेत्रात रिमझिम पाऊस सुरू असून, अधूनमधून सरी कोसळत असल्याने नद्या आणि ओढ्यांमधून पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे वरसगाव, पानशेत आणि टेमघर धरणांतून अतिरिक्त पाणी खडकवासलात सोडले जात आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *