हडपसरमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान मानसिक छळ; अपक्ष उमेदवार सादिक ऊर्फ बाबू कपूर यांचा मृत्यू
पुणे, प्रतिनिधी —
पुण्यातील हडपसर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली असून प्रभाग क्रमांक ४१ मधील अपक्ष उमेदवार सादिक ऊर्फ बाबू कपूर यांचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. निवडणूक प्रचारादरम्यान त्यांना सातत्याने मानसिक छळ सहन करावा लागल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
पहा व्हिडिओ
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, प्रचाराच्या काळात सादिक कपूर यांच्यावर दबाव, अपप्रचार व मानसिक तणाव वाढवणाऱ्या प्रकारांचा सामना करावा लागला. या सततच्या छळामुळेच हा दुर्दैवी प्रकार घडल्याचा दावा करण्यात येत असून संबंधित जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे.
घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आहे. पोलिसांकडून सर्व आरोपांची गंभीरतेने दखल घेतली जात असून संबंधित पुरावे गोळा करणे, प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवणे आणि घटनाक्रमाचा सखोल आढावा घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या घटनेमुळे स्थानिक राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून निवडणूक काळातील वाढता तणाव आणि उमेदवारांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.