पुणे : जरांगें विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट! पुण्यातील प्रकरण काय?
पुणे : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात पुणे सत्र न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. कोथरूड पोलीस ठाण्यात मनोज जरांगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याच प्रकरणात आता न्यायालयाने जरांगे पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट काढले आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या जुन्या प्रकरणात अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यावर फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आलेला असून, पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हाही दाखल झालेला आहे.
मनोज जरांगेंविरोधात कोणी केली तक्रार?
पुण्यातील एका नाट्यनिर्मात्याने मनोज जरांगे यांच्यावर फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.
मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एका नाटकाच्या प्रयोगांचे आयोजन केले होते. त्यासंदर्भात नाट्य निर्मात्याला मनोज जरांगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पूर्ण पैसे दिले गेले नाही.
निर्मात्याने कोथरूड पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली होती. पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणाची पुणे न्यायालयात सुनावणी सुरू आहे.