शेवटच्या 72 तासांत ध्वनीक्षेपक बंद; नियम मोडल्यास उमेदवार अडचणीत!

0

पुणे: विधानसभा निवडणुकीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पुणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ध्वनीक्षेपक वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड संहितेच्या कलम 223 नुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी स्पष्ट केले आहे.

11 मतदारसंघांमध्ये कठोर अंमलबजावणी
पुणे आयुक्तालयाच्या हद्दीतील शिरूर, पुरंदर, भोर, वडगावशेरी, शिवाजीनगर, कोथरूड, खडकवासला, पर्वती, हडपसर, पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबा या 11 विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी हे आदेश लागू करण्यात आले आहेत. सोमवारी, 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजल्यापासून ही बंदी लागू झाली असून ती 20 नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया संपेपर्यंत कायम राहील.

नियमभंगास शिक्षेची तरतूद
भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदानाच्या शेवटच्या 72 तासांत ध्वनीक्षेपक वापरण्यावर निर्बंध आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पोलिसांकडून तातडीने कारवाई केली जाईल.

मतमोजणी 23 नोव्हेंबरला
या 11 मतदारसंघांमध्ये 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून, 23 नोव्हेंबरला मतमोजणी होईल. शांततापूर्ण वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *