देहूरोडमध्ये किरकोळ कारणावरून हत्या, आरोपींना पोलिस कोठडी
पिंपरी : घराच्या खोलीचा पत्रा वाजविल्याच्या
किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाची हत्या करणाऱ्या दोन आरोपींना देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींना ८ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
खून झालेल्या व्यक्तीचे नाव अमोदकुमार मोहित यादव (मूळ रा. बिहार) असून, अटक करण्यात आलेले आरोपी भोगेंद्रकुमार जोखन सदाय (वय २३, रा. सणसवाडी, शिक्रापूर, पुणे) आणि जयप्रकाश रामकिसन सदाय (वय १९, रा. हांडेवाडी, कात्रज, पुणे) हे मूळ गंगापूर, मधुबनी, बिहार येथील रहिवासी आहेत.
याप्रकरणी मयताचा भाऊ प्रमोद यादव याने देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. अमोदकुमार यादव मित्रांसोबत असताना जयप्रकाश व भोगेंद्र यांनी त्यांच्या खोलीचा पत्रा वाजविला. या छोट्या वादाचे रुपांतर मोठ्या भांडणात झाले आणि दोन्ही आरोपींनी रागाच्या भरात अमोदकुमारच्या डोक्यात आणि पाठीत लाकडी दांडक्याने मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या अमोदकुमारचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
पोलिस तपासात भोगेंद्र शिक्रापूर येथे पळून गेल्याचे समजले. पोलिसांनी तातडीने त्याला दोन तासांच्या आत ताब्यात घेतले.
त्याच्याकडून खुनाची कबुली मिळाली असून, जयप्रकाशच्या मदतीने हल्ला केला असल्याचे उघड झाले. जयप्रकाश मुंबईहून रेल्वेने बिहारला पळून जात असताना भुसावळ रेल्वे जंक्शनवरून त्याला शिताफीने अटक करण्यात आली.