निवडणुकीपुरताच ‘कायद्याचा धडाका’? पिंपरीत पोलिस कारवायांचा फार्स उघड
पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीची घोषणा होताच शहरातील कायदा-सुव्यवस्था अचानक जागी झाल्याचे चित्र दिसत आहे. वर्षभर डोळ्यासमोर सुरू असलेले अवैध धंदे आता पोलिसांना दिसू लागले असून, कारवाईच्या नावाखाली सुरू असलेला हा सगळा प्रकार म्हणजे निवडणूकपुरता ‘फार्स’ असल्याची तीव्र चर्चा नागरिकांत रंगू लागली आहे.
गुटखा, गांजा, अवैध दारूविक्री, वेश्याव्यवसाय, बेकायदेशीर स्पा सेंटर, तडीपार गुंड, पिस्तूल बाळगणारे गुन्हेगार—हे सगळे घटक कालपर्यंत कुठे लपले होते, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. निवडणूक जाहीर होताच गल्लीबोळात छापे, धडाधड प्रेसनोट्स आणि कारवाईचे आकडे प्रसिद्ध होत आहेत. मात्र, “निवडणूक नसती तर ही कारवाई झाली असती का?” असा टोमणा सामान्य नागरिक मारत आहेत.
१५ जानेवारीला मतदान होणार असल्याने पोलिस, प्रशासन आणि उत्पादन शुल्क विभाग एकदमच ‘अलर्ट मोड’वर आले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागही कधी नव्हे तो सक्रिय झाल्याचे दाखवत अवैध दारूधंद्यांवर धाडी टाकत आहे. वर्षभर शांत बसलेल्या यंत्रणा अचानक एवढ्या कार्यक्षम कशा झाल्या, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.
तडीपार गुंड वर्षभर शहरात वावरत असताना ते निवडणुकीच्या तोंडावरच पोलिसांच्या नजरेस पडतात, हीच खरी गंमत असल्याचे नागरिक म्हणतात. बेकायदा पिस्तूल, अमली पदार्थांची विक्री आणि इतर गुन्हे हे कालपर्यंत ‘दिसत नव्हते’, पण आता मात्र ते पोलिसांच्या सापळ्यात अडकत आहेत—यालाच कायदा-सुव्यवस्थेचे यश म्हणायचे का, असा उपरोधिक सवाल उपस्थित होत आहे.
एकूणच, निवडणूक आचारसंहिता लागू होताच सुरू झालेला हा ‘कारवाईचा धडाका’ म्हणजे कायद्याचा धाक नसून, केवळ मतदारांना दाखवण्यासाठी केलेला देखावा असल्याची भावना पिंपरी-चिंचवडकरांमध्ये वाढत आहे. निवडणुकीनंतरही हीच तत्परता टिकेल का, की पुन्हा अवैध धंद्यांना मोकळे रान मिळेल—याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.