बांधकाम कामगारांसाठी महत्त्वाची सूचना, मोबाईलवरच करा नोंदणी नूतनीकरण!

पुणे : महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत नोंदणीकृत सर्व कामगारांसाठी दरवर्षी नोंदणीचे नूतनीकरण करणे बंधनकारक आहे. जर हे नूतनीकरण वेळेत झाले नाही, तर शैक्षणिक, आरोग्यविषयक, सुरक्षा आणि इतर अनेक योजनांचे लाभ कामगारांना मिळणार नाहीत.
मात्र यंदापासून ही प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे. आता कामगारांना कार्यालयीन फेऱ्या न मारता मोबाईलवरूनच नूतनीकरण करता येणार आहे. मंडळाच्या https://mahabocw.in/ या अधिकृत वेबसाइटवरून ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
नोंदणी नूतनीकरण प्रक्रिया :
मोबाईलवरील गुगल क्रोम ब्राउझरमध्ये MahaBOCW वेबसाइट उघडावी.
‘डेस्कटॉप साइट’ पर्याय सुरू करून ‘Construction Worker Online Renewal’ टॅबवर क्लिक करावे.
नोंदणी क्रमांक टाकून अर्ज पुढे सुरू करता येतो.
कामगारांनी पुढील ९० दिवसांच्या कामाचा दाखला (कंत्राटदार, ग्रामसेवक किंवा नगरपालिका कार्यालयाकडून मिळणारा) अपलोड करणे आवश्यक आहे.
दाखला २ एमबीपेक्षा कमी आकाराचा फोटो किंवा PDF स्वरूपात अपलोड करावा.
OTP पडताळणी केल्यानंतर अर्ज सबमिट करून त्याची पावती (Acknowledgement Number) सुरक्षित ठेवावी.
अर्ज मंजूर झाल्यानंतर कामगारांनी ऑनलाइन शुल्क भरून नोंदणी नूतनीकरण पूर्ण करायचे आहे.
वेळेत नूतनीकरण का आवश्यक?
जर नूतनीकरण वेळेत झाले नाही तर मंडळाकडून मिळणारे शिष्यवृत्ती, आरोग्य विमा, अपघात विमा, घरकुल, तसेच इतर कल्याणकारी योजनांचे लाभ कामगारांना मिळणे बंद होईल.
कामगारांच्या सोयीसाठी ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन करण्यात आली असून, स्मार्टफोनद्वारे काही मिनिटांत अर्ज सादर करता येणार असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले आहे.
बांधकाम क्षेत्रातील सर्व नोंदणीकृत कामगारांनी लवकरात लवकर मोबाईलवरून नूतनीकरण करून सरकारी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
—