रुग्णालय की छळछावणी? केईएम रुग्णालयात वरिष्ठ डॉक्टरवर सहा महिला डॉक्टरांकडून लैंगिक छळाचे आरोप; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, रुग्णालयात चौकशी सुरू

मुंबई, १९ एप्रिल : मुंबईतील प्रतिष्ठित केईएम रुग्णालय पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले असून, फॉरेन्सिक विभागातील प्राध्यापक डॉ. रविंद्र देवकर यांच्यावर सहा महिला डॉक्टरांनी लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणामुळे रुग्णालयात खळबळ उडाली असून, तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महिला डॉक्टरांनी दिलेल्या तक्रारीनुसार, डॉ. देवकर यांनी त्यांच्या मांडी आणि पाठीवर हात फिरवून मानसिक व शारीरिक छळ केला. यासंबंधी लेखी तक्रार रुग्णालयाचे डीन आणि संबंधित विभागप्रमुखांकडे दाखल करण्यात आली असून, त्यानंतर भोईवाडा पोलीस ठाण्यात देखील गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
प्रकरणाच्या गांभीर्याची दखल घेत मुंबई महापालिकेने आणि रुग्णालयाच्या अंतर्गत तक्रार समितीने चौकशी सुरु केली आहे. या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत डॉ. देवकर यांना निलंबित करण्यात आले असून, त्यांना सर्व शैक्षणिक आणि प्रशासकीय जबाबदाऱ्यांपासून दूर ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, डॉ. देवकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. या सर्व घडामोडींमुळे केईएम रुग्णालयात मोठा तणाव निर्माण झाला असून, महिला डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
रुग्णालय प्रशासनाने या प्रकरणात पारदर्शकपणे चौकशी केली जाईल आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. चौकशी समितीचा अहवाल लवकरच सादर होणार आहे.