पुणे: भाऊबीजेच्या दिवशी पुण्यातील भावनिक घटना; विष प्राशन केलेल्या बहीण-भावाचे अग्निशमन दलाने प्राण वाचवले
पुणे : दिवाळीचा सण असताना रविवारी भाऊबीजेच्या दिवशी पुण्यात एक हृदयद्रावक घटना घडली. नैराश्याने ग्रस्त असलेल्या वानवडी येथील एका १९ वर्षीय तरुण व त्याच्या २४ वर्षीय बहिणीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्या आईला व्हिडिओ कॉलद्वारे हा निर्णय सांगितला, ज्यामुळे घाबरलेल्या आईने तात्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी अग्निशमन दलाला याबाबत कळवले, ज्यामुळे अग्निशमन दलाच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे या दोघांचे प्राण वाचले.
वानवडीतील कृष्ण कन्हैया सोसायटीत राहणाऱ्या या बहीण-भावाने घरात स्वतःला कोंडून विष प्राशन केले. रात्री १०.३० वाजता अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी डोअर ब्रेकर आणि इतर साधनांचा वापर करून काही मिनिटांतच दरवाजा उघडला. आतमध्ये दोघेही बेशुद्ध अवस्थेत आढळले. तात्काळ त्यांना अग्निशमन दलाच्या वाहनातून जवळच्या रुबि हॉस्पिटलमध्ये दाखल केले, जिथे उपचारांमुळे त्यांचे प्राण वाचले आहेत.
अग्निशमन दलाची तत्पर कारवाई
घटनास्थळी उपस्थित अग्निशमन दलाचे वाहनचालक दत्ता अडाळगे आणि जवान सत्यम चौखडे, सुभाष खाडे, सागर दळवी, निलेश वानखेडे, श्रेयस मेटे, महेश पांडे, सुरज हुलवान, हर्षवर्धन खाडे, अनुराग पाटील, रितेश मोरे यांनी या कामगिरीत मोलाची भूमिका बजावली. तात्काळ घेतलेल्या या निर्णायक कारवाईमुळे बहीण-भावाचे प्राण वाचले.
रुबि हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले असून ते लवकरच बरे होतील, असेही स्पष्ट केले आहे. कुटुंबीयांनी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले असून, या तात्काळ कारवाईमुळे भाऊबीजेच्या दिवशी या बहीण-भावाला जीवनदान मिळाले.
Kyu piya tha poison