धान्य न उचलणाऱ्या साडेतीन लाख शिधापत्रिकांचे धान्य बंद; मृत व्यक्तींची नावे थेट शिधापत्रिकेतून वगळण्याचे आदेश

पुणे – सहा महिन्यांहून अधिक काळ धान्य न उचलणाऱ्या राज्यातील सुमारे ३ लाख ३३ हजार ८८१ शिधापत्रिकांवरील धान्य बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. हे धान्य आता प्रतीक्षा यादीतील शिधापत्रिकाधारकांना दिले जाणार असून, संबंधित आदेश सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी व अन्नधान्य वितरण अधिकार्यांना देण्यात आले आहेत.
राज्यात एकूण ८ लाख ७३ हजार ६३ शिधापत्रिकाधारक आहेत. केंद्र शासनाच्या अंत्योदय आणि प्राधान्य योजनेतून या लाभार्थ्यांना कोटा निश्चित करून धान्य पुरवठा केला जातो. मात्र, सर्व राज्यांसाठी एकत्रित कोटा ठरवला जात असल्याने जिल्ह्यांच्या मागणीनुसार कोटा वाढवणे शक्य होत नाही.
यावर तोडगा म्हणून, जे लाभार्थी पात्र असूनही सलग सहा महिने धान्य उचलत नाहीत, त्यांचा कोटा बंद करून तो प्रतीक्षा यादीतील ग्राहकांना देण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. तसेच, कुटुंबातील मृत व्यक्तींच्या दाखल्यावरून त्यांची नावे थेट शिधापत्रिकेतून वगळण्याची कार्यवाही करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
या निर्णयामुळे प्रतीक्षा यादीवरील हजारो कुटुंबांना आता स्वस्त धान्याचा लाभ मिळणार आहे.