येरवड्यातील वीज समस्येला अखेर पूर्णविराम; ४ वर्षांच्या पाठपुराव्याला यश

0
IMG_20260412_220913.jpg

पुणे : येरवडा परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या लो-व्होल्टेज व वारंवार वीज खंडित होण्याच्या समस्येला अखेर कायमचा दिलासा मिळाला आहे. सिद्धार्थ नगर परिसरातील जुन्या व कमी क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मरमुळे अनेक वर्षांपासून नागरिक त्रस्त होते. मात्र, तब्बल चार वर्षांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर ही समस्या मार्गी लागली आहे.

सिद्धार्थ नगर येथे असलेला २०० क्षमतेचा जुना ट्रान्सफॉर्मर काढून त्याऐवजी ३२५ क्षमतेचा नवीन हाय-कॅपॅसिटी ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आला आहे. या बदलामुळे परिसरातील वीज पुरवठा अधिक सुरळीत व स्थिर होणार असल्याचे सांगण्यात आले.

या निर्णयाचा लाभ सिद्धार्थ नगर, मदर तेरेसा नगर, येरवडा गावठाण, काश्मिरी कॉलनी, मस्जिद गल्ली आणि शेलार चाळ या भागांतील नागरिकांना होणार आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेली ही समस्या सुटल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

दरम्यान, हे काम मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज मंडळ (MSEB) चे अधिकारी पाटील यांचे विशेष योगदान लाभले. तसेच, या विषयावर सातत्याने पाठपुरावा करणारे डॅनियल लांडगे यांचेही नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.

येरवडा परिसरातील नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी अशा प्रकारचा पाठपुरावा भविष्यातही सुरू राहणार असल्याचे संबंधितांकडून स्पष्ट करण्यात आले.

Spread the love

Leave a Reply