पुणे महापालिकेच्या ‘मोहा’पायी पुन्हा फिल्डिंग! | बदली झालेले अधिकारी पुन्हा महापालिकेत नियुक्तीसाठी सज्ज

IMG_20250304_122736.jpg


— प्रतिनिधी, पुणे
पुणे | राज्य शासनाने नुकत्याच शहरी भागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून, त्यात पुणे महापालिकेतील उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. मात्र, बदली होऊनही काही अधिकाऱ्यांना महापालिकेचा ‘मोह’ काही सुटत नसल्याचे चित्र पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. बदलीनंतरही हेच अधिकारी महापालिकेत पुनर्नियुक्तीसाठी प्रयत्न करत असल्याचे समोर आले असून, यासाठी राजकीय दबाव आणि आर्थिक लॉबिंगचा वापर होत असल्याची जोरदार चर्चा आहे.

महापालिकेतील महत्वाच्या खात्यांवर नियुक्ती मिळावी म्हणून काही अधिकारी मुंबई दरबारात आर्थिक देवाणघेवाण करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या लॉबिंगसाठी महापालिकेतील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही गुप्त पाठबळ असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे, बदलीनंतर काही अधिकारी चौथ्या मजल्यावर पुन्हा एकदा ‘पुष्पगुच्छ’ घेऊन अवतरल्याचेही पाहायला मिळाले. त्यांचा आविर्भावही “आम्ही अजूनही उपायुक्तच आहोत” असा होता, ही बाब लक्षवेधी ठरते.

गेल्या काही वर्षांत पुणे महापालिकेत अधिकारी बदल्यांबाबत ‘एक विशिष्ट पायंडा’ पडल्याचे चित्र दिसून येते. बदलीनंतरही तेच अधिकारी पुन्हा परत येतात. यामागे राजकीय हस्तक्षेप आणि आर्थिक स्वार्थाचे मजबूत धागेदोरे असल्याचे प्रशासकीय वर्तुळात बोलले जात आहे.

दरम्यान, महापालिकेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असून, निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार एकाच जिल्ह्यात तीन वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची बदली केली जाते. मात्र, अशा स्पष्ट नियमानंतरही काही अधिकारी निर्धास्तपणे पुन्हा महापालिकेत येण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

या पार्श्वभूमीवर नव्याने नियुक्त झालेले आयुक्त नवल किशोर राम यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. पंतप्रधान कार्यालयातून थेट महापालिकेत आलेले आयुक्त अशा दबावखोरीपुढे झुकतील, अशी शक्यता कमी असल्याची चर्चाही प्रशासकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत या लॉबिंगबाबत कोणती दिशा घेतली जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Spread the love

You may have missed