मंचरमध्ये महिला पत्रकार स्नेहा बारवे यांच्यावर हल्ला : निषेधाची लाट, आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी – आंदोलनाचा इशारा

मंचर, १५ जुलै –
मंचर येथील पत्रकार स्नेहा बारवे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात विविध पत्रकार संघटना आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी एकत्र येत तीव्र आंदोलन केलं. काळ्या फिती लावून, हातात फलक घेऊन आणि घोषणाबाजी करत त्यांनी हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी केली.
प्रकरणातील काही आरोपींना पोलिसांनी अटक केली असली, तरी उर्वरित फरार आरोपींना तत्काळ ताब्यात घेण्याची मागणी आंदोलकांनी केली. तसेच, हल्लेखोरांवर “पत्रकार संरक्षण कायदा” अंतर्गत गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
“पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आज गंभीर झाला आहे. जर पत्रकारच असुरक्षित असतील, तर लोकशाहीचे रक्षण कोण करणार?” असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला. हल्ल्याचा तीव्र निषेध करत, स्नेहा बारवे यांना तातडीने न्याय मिळावा, अशी मागणीही करण्यात आली.
या आंदोलनानंतर मंचर प्रांत कार्यालयात नायब तहसीलदार सचिन मुंडे यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात हल्लेखोरांवर कठोर कारवाई, पत्रकारांना संरक्षण आणि पोलिसांकडून निष्पक्ष तपासाची मागणी करण्यात आली आहे.
पत्रकारांवर वारंवार होत असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन मोठ्या स्वरूपात उभारण्यात आले होते. यामुळे प्रशासन आणि पोलीस यंत्रणेसमोरही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.