अक्कलकोट बसस्थानक पायवाटेच्या मागणीसाठी उपोषणाला; इस्माईल आळंद यांचा पाठिंबा

अक्कलकोट, (तालुका प्रतिनिधी) दि. १२: अक्कलकोट येथे नव्याने उभारल्या जाणाऱ्या बसस्थानकामध्ये दक्षिण भागातील नागरिकांसाठी पायवाट उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते बुडन तांबोळी यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला मैंदर्गी येथील सामाजिक कार्यकर्ते इस्माईल उस्मान आळंद यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.
बुडन तांबोळी यांनी ९ जून रोजी अक्कलकोट बस डेपोसमोर हे उपोषण सुरू केले आहे. इस्माईल आळंद यांनी तांबोळी यांना पाठिंबा पत्र देताना म्हटले आहे की, “अक्कलकोट बस स्थानकातून दक्षिणेकडे पायवाट सोडण्याच्या आपल्या न्यायपूर्ण मागणीसाठी आपण अक्कलकोट येथील बस डेपोसमोर सुरू केलेल्या आमरण उपोषणाला मैंदर्गी येथील एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी, आपल्याला जाहीर पाठिंबा करतो.”

आळंद यांनी तांबोळींच्या या प्रयत्नांचे कौतुक केले असून, यामुळे अक्कलकोट शहरातील नागरिकांना ये-जा करणे सोयीचे होईल अशी आशा व्यक्त केली आहे. “आपण नागरिकांच्या सोयीसाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे, हे अत्यंत कौतुकास्पद आहे,” असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
बुडन तांबोळी यांच्या या उपोषणाला यापूर्वीच रिपब्लिकन पक्ष आठवले गट, वंचित बहुजन आघाडी, लहुजी शक्ती सेना यांसारख्या संघटनांनी तसेच विविध पक्षातील नेतेमंडळी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला आहे. आता इस्माईल आळंद यांनीही आपण या लढ्यात तांबोळींसोबत असून त्यांच्या मागणीला पूर्ण पाठिंबा देत असल्याचे स्पष्ट केले आहे.
आळंद यांनी तांबोळींच्या उपोषणाला यश मिळो आणि त्यांच्या मागण्या लवकरच पूर्ण व्हाव्यात अशी आशा व्यक्त केली आहे. त्यांच्या या पाठिंब्यामुळे बुडन तांबोळी यांच्या आंदोलनाला आणखी बळ मिळाल्याचे बोलले जात आहे.