खेड तहसील कार्यालयात खळबळ: रेशनकार्ड प्रकरण मिटवण्यासाठी 10 लाखांच्या खंडणीची मागणी; पुनर्वसन विभागातील कारकून व रेशनकार्ड धारक यांच्याविरोधात कारवाईची मागणी

ration-card_20180694815.jpg

राजगुरुनगर, 29 नोव्हेंबर: खेड तहसील कार्यालयात रेशनकार्ड प्रकरण मिटवण्यासाठी थेट तहसीलदार ज्योती देवरे यांच्याकडे 10 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा खळबळजनक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी तहसीलदार देवरे यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

तहसीलदार देवरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सन 2015 ते 2023 या कालावधीत रेशनकार्ड वाटपातील काही प्रकरणांची चौकशी सुरू होती. एका तक्रारदाराने पुरवठा निरीक्षक अधिकाऱ्यांवर एका लाभार्थीला ऑनलाइन चार हजार रुपये घेऊन रेशनकार्ड दिल्याचा आरोप केला होता. या चौकशीत तहसीलदारांना काही रेशनकार्ड गहाळ असल्याचे निदर्शनास आले.

या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच तहसीलदारांना एका व्यक्तीकडून मोबाइलवर संदेश मिळाला. संदेशामध्ये प्रकरण मिटवण्यासाठी 10 लाख रुपये द्यावे, अशी मागणी करण्यात आली. या प्रकारामुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

तहसीलदार देवरे यांनी याबाबत खेड पोलिसात लेखी तक्रार दाखल केली असून, पुनर्वसन आणि रोजगार हमी योजनेचे अव्वल कारकून सुनील किसन नंदकर यांच्यासह रेशनकार्ड धारक महेश लक्ष्मण नेहरे यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून, दोषींविरुद्ध कठोर कारवाईची शक्यता आहे. महसूल विभागातील अशा प्रकारांमुळे नागरिकांच्या हक्कांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने या प्रकरणाने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Spread the love