ई-केवायसी बंधनकारक, लाभार्थ्यांसाठी मुदतवाढ; ३१ डिसेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन; प्रशांत खताळ, सहायक अन्नधान्य वितरण अधिकारी
पुणे – राज्य शासनाने रेशन धान्य वितरणात होणारी गळती रोखण्यासाठी शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसी (इलेक्ट्रॉनिक केवायसी) प्रक्रिया बंधनकारक केली आहे. याअंतर्गत शिधापत्रिकेवर नाव असलेल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला ई-केवायसी पडताळणी करावी लागणार आहे. पूर्वी ३१ ऑक्टोबर ही अंतिम तारीख असली, तरी विविध अडचणी आणि लाभार्थ्यांचा कमी प्रतिसाद लक्षात घेता ही मुदत वाढवून ३१ डिसेंबर करण्यात आली आहे.
राज्यातील सर्व रेशन कार्ड आधार क्रमांकाला जोडण्यात आले असले तरी वितरणात अजूनही २ ते ४ टक्के गळती होत असल्याचे समोर आले आहे. हे प्रमाण शून्य करण्यासाठी आणि वितरण अधिक पारदर्शक करण्यासाठी ई-केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. या प्रक्रियेत लाभार्थ्यांना त्यांच्या आधार कार्डसह रेशन दुकानात जाऊन फोरजी ई-पॉस मशीनवर बोटांचे ठसे स्कॅन करून ई-केवायसी पूर्ण करावी लागेल. परंतु, यामध्ये अनेकदा सर्व्हर डाऊन झाल्यामुळे अनेक लाभार्थ्यांना ई-केवायसी करता आली नाही. त्यामुळे केंद्र शासनाने या प्रक्रियेस मुदतवाढ दिली आहे.
अन्नधान्य परिमंडळ विभागाकडून शिधापत्रिका धारकांना वेळेत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अनेक लाभार्थी सध्या सुट्ट्यांमुळे गावी गेले असल्याने आणि काहींच्या केवायसी प्रक्रियेत त्रुटी राहिल्याने मुदतवाढ दिल्याचेही सांगण्यात आले. यासाठी डोळ्यांद्वारे नोंदणीची सुविधा देण्यात आली आहे, ज्यामुळे प्रक्रिया अधिक गतीने पार पडत आहे.
ई-केवायसीसाठी ३१ डिसेंबर अंतिम तारीख
ई-केवायसी प्रक्रिया ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करणे आवश्यक असून नागरिकांनी लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन सहायक अन्नधान्य वितरण अधिकारी प्रशांत खताळ यांनी केले आहे. तसेच, कोणत्याही तक्रारी असल्यास प्रशासनाला संपर्क साधावा, असेही त्यांनी सूचित केले.