पुणे महापालिकेतील शिक्षणसेवकांना दिवाळी भेटीपासून वंचित; शिक्षक संघटनेची नाराजी

पुणे, प्रतिनिधी: पुणे महापालिकेतील शिक्षणसेवकांना यंदाही दिवाळी भेटीपासून वंचित ठेवण्यात आल्याने शिक्षक वर्गात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. महापालिकेतील कायमस्वरूपी कर्मचारी आणि शिक्षकांना पगाराच्या ८.३३ टक्के इतकी सानुग्रह अनुदानाची रोख भेट देण्यात येते. मात्र मानधनावर कार्यरत असलेल्या शिक्षणसेवकांना ही भेट नाकारण्यात आली आहे, अशी माहिती शिक्षक संघटनेकडून देण्यात आली.
महापालिकेतील सुमारे ४५० हून अधिक शिक्षणसेवकांनी १८० दिवसांची सेवा पूर्ण केली असूनही त्यांना अद्याप दिवाळी भेट मिळालेली नाही. कामगार युनियन आणि महापालिका प्रशासन यांच्यात सन २००३ मध्ये झालेल्या करारानुसार १८० दिवस पूर्ण केलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला बोनस देणे बंधनकारक आहे. तरीही शिक्षण विभागातील सेवकांना या लाभापासून वंचित ठेवण्यात येत आहे, असा आरोप शिक्षक संघटनेकडून करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, पुणे शहरचे प्रतिनिधी हनुमंत रणदिवे यांनी म्हटले की, “दिवाळी भेट ही केवळ आर्थिक मदत नसून शिक्षकांच्या प्रामाणिक परिश्रमांची सामाजिक मान्यता आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी ही भेट वितरित करून शिक्षणसेवकांची दिवाळी गोड करावी.”
दरम्यान, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चंद्रन यांनी सांगितले की, कंत्राटी आणि पात्र ठरलेल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र परीविक्षाधीन कर्मचाऱ्यांना ती देता येत नाही. तरीही शिक्षणसेवकांचा विषय तपासून आवश्यक ती पडताळणी करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.