राजकीय प्रचारात सहभागी झाल्यास शिस्तभंगाची कारवाई होणार – शिक्षण विभागाचा इशारा
मुंबई : राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे आणि त्यांना संलग्नित महाविद्यालयांतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाच्या प्रचार कार्यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या सहभागी होऊ नये, असे स्पष्ट निर्देश राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी दिले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा आदेश देण्यात आला आहे, जो विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये काटेकोरपणे पाळला जाणार आहे.
विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्यामुळे राज्यात विविध राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे. उमेदवारांचे प्रचार दौरे, सभांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. मात्र, शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचार्यांना कोणत्याही राजकीय पक्षाशी प्रचारासाठी संबंध ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे. विद्यापीठांतील प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांनाही याच नियमांचे पालन करावे लागणार आहे, अन्यथा शिस्तभंगाच्या कठोर कारवाईचा सामना करावा लागू शकतो.
उच्च शिक्षण संचालक देवळाणकर यांनी राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलसचिवांना व विभागीय सहसंचालक कार्यालयांना परिपत्रक पाठवले आहे. या परिपत्रकात महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 च्या नियम 5 (1) नुसार शासकीय कर्मचारी राजकीय पक्षांचा सदस्य होऊ शकत नाही, तसेच कोणत्याही राजकीय संघटनेशी संबंध ठेवू शकत नाही, असा आदेश दिला आहे.