अपंग कामगाराला हॉटेलमध्ये घुसून मारहाण; ताडीवाला रोड मध्ये राहणाऱ्या महिला सामाजिक कार्यकर्त्यावर शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

शिक्रापूर (ता. शिरूर) | प्रतिनिधी
शारदा हॉटेलमध्ये घुसून एका अपंग कामगाराला महिलांसह एका व्यक्तीने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. “तू हॉटेलमध्ये बाया पुरवतो का?” असा अपमानास्पद सवाल करत संबंधित कामगाराला शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण करण्यात आली. या प्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी गोविंद नारायण शिंदे (वय ३५, रा. कुंभारवाडा, शिक्रापूर) यांनी फिर्याद दिली असून, स्वाती विलास गायकवाड, अर्चना विशाल केदारी (दोघी रा. ताडीवाला रोड, पुणे), संगीता वानखेडे (रा. मोशी, पुणे) आणि महेश खांदवे (रा. लोहगाव, पुणे) अशी आरोपींची नावे आहेत. या चौघांवर भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दैनिक परभात ने दिलेल्या वृत्तानुसार, फिर्यादीतील माहितीनुसार, गोविंद शिंदे हे शिक्रापूर येथील शारदा हॉटेलमध्ये किचन विभागात काम करत होते. त्यावेळी वरील आरोपी हॉटेलमध्ये आले आणि त्यांनी गोविंद यांना “तू इथे बायांना पुरवतो का?” असा अपमानजनक प्रश्न विचारला. त्यानंतर त्यांना शिवीगाळ करत किचनमध्येच मारहाण केली. पीडित गोविंद यांनी “मी अपंग आहे, कृपया मारू नका” असे विनवले तरीही आरोपी थांबले नाहीत. इतकेच नव्हे, तर हॉटेलमधील अन्य खोल्यांमध्ये जाऊन त्यांनी शोधाशोधही केली.
घटनेनंतर पीडिताने शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पुढील तपास पोलीस हवालदार गणेश करपे करीत आहेत.
या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, अपंग व्यक्तीवर झालेल्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.