चाकण परिसरात धोकादायक वाहतूक; अपघातांना आमंत्रण

चाकण, ता. 20 : चाकण औद्योगिक वसाहत व परिसरात धोकादायक व अवैध प्रवासी वाहतूक दिवसेंदिवस वाढत असून अपघातांना आमंत्रण मिळत आहे. रिक्षांमधून क्षमतेपेक्षा दुप्पट प्रवासी भरले जातात, तर पिकअप, टेम्पो, जीप यामधून प्रवासीच नव्हे तर बैल-घोड्यांची वाहतूकही धोकादायक पद्धतीने केली जाते.
प्रवासी कोंबून रिक्षामध्ये १२ ते १५ जण बसवले जातात. त्यामुळे रिक्षा चालवणाऱ्या चालकासही गाडी नियंत्रित करणे अवघड होते. तरीदेखील केवळ अधिक पैसे कमविण्याच्या उद्देशाने असे प्रकार सर्रास सुरू आहेत. काही दुचाकी चालक तर मोठ्या प्रमाणात मालवाहतूक करीत असून यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
पिकअप व टेम्पोंच्या टपावर दहा ते पंधरा तरुण बसून प्रवास करताना दिसतात. बैलगाडा शर्यतीसाठी वाहने भरून बैल व घोडी नेण्याचे प्रकारही सुरू आहेत. अशा पद्धतीची वाहतूक कायद्याला धाब्यावर बसवणारी असून ती जीवघेणी ठरत आहे.
या सर्व प्रकारांवर वाहतूक विभाग कारवाई करीत असला तरीही काही चालक जाणूनबुजून हे प्रकार करीत असल्याचे समोर आले आहे.
“रिक्षा, जीप, टेम्पो तसेच दुचाकीवरून होणारी बेकायदा व धोकादायक वाहतूक रोखण्यासाठी कारवाई सुरू आहे. तरीदेखील काही चालक पैसे कमविण्यासाठी जाणूनबुजून धोका पत्करतात,” असे प्रमोद वाघ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, चाकण वाहतूक विभाग यांनी सांगितले.