थंडीचा जोर आणि पावसाची शक्यता, पुढील तीन दिवस नागरिकांवर संकट

0

पुणे – राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी घट झाली असून थंडीचा जोर वाढला आहे. हवामानात अचानक बदल झाल्यामुळे काही शहरांचा पारा कमालीचा खाली गेला आहे. पुढील काही दिवसांत राज्यात थंडी आणखी वाढण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाने सूचित केले आहे.

याचसोबत काही भागांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे चक्रीवादळाची स्थिती तयार झाली असून त्याचा परिणाम म्हणून काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पश्चिम बंगाल आणि चेन्नई परिसरात चक्रीवादळासारखी स्थिती निर्माण झाली असून, राज्यातील किनारपट्टी जवळील गावांवर त्याचा प्रभाव पडू शकतो. विशेषत: रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

प्रामुख्याने १४ आणि १५ नोव्हेंबर रोजी रत्नागिरी व सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. यानंतर तापमानात आणखी घट होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

सध्या मुंबई, उपनगर, ठाणे, आणि नवी मुंबईत सकाळच्या वेळी गारवा जाणवत आहे, तर पुढील दोन दिवसांत तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा आणि घाटमाथ्यालाही १४ व १५ तारखेला वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यातही वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. तर लातूर, धाराशिव, आणि सोलापूरमध्ये हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

राज्यात दिवसात ऊन आणि रात्री गारठा असा वातावरण आहे. काही ठिकाणी सकाळच्या वेळी धुकं तर काही ठिकाणी दमट वातावरण नागरिक अनुभवत आहेत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *