अक्कलकोट स्वामींच्या चरणी नतमस्तक; भोकरे दाम्पत्याकडून प्रचाराचा शुभारंभ
पुणे, दि. — स्वामी समर्थ कृपा करावी आणि जनसेवेची संधी द्यावी, असे साकडे अक्कलकोट स्वामी समर्थांच्या चरणी घालत अमृता व गणेश सोमनाथ भोकरे या दाम्पत्याने आपल्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला. प्रभाग क्र. २५-अ (शनिवार पेठ, महात्मा फुले मंडई परिसर) येथून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अमृता गणेश भोकरे महापालिकेच्या निवडणूक रिंगणात आहेत.
अक्कलकोट येथे स्वामींचे दर्शन घेत भावनिक आवाहन करताना अमृता भोकरे म्हणाल्या की, या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रामाणिक, कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची एक संधी स्वामींच्या कृपेने मिळावी. नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होणारे नेतृत्व निर्माण करण्याचा आपला निर्धार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या दर्शनयात्रेत सहभागी झालेल्या माता-भगिनींनी प्रवासाचे उत्तम नियोजन, दर्शनाची व्यवस्था तसेच नाश्ता व जेवणाची सोय याबाबत समाधान व्यक्त केले. मुलाप्रमाणे काळजी घेणारा आणि जनतेशी आपुलकीने वागणारा नेता आम्हाला हवा आहे, अशी भावना उपस्थित महिलांनी व्यक्त केली.
शनिवार, नारायण, सदाशिव व शुक्रवार पेठांसह महात्मा फुले मंडई परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने या दर्शनयात्रेत सहभाग घेतला. यावेळी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक जन्मजेयराजे भोसले, ज्येष्ठ नेते बाळासाहेब दाभेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आणि नागरिकांच्या पाठबळावर विकासाची नवी दिशा देण्याचा संकल्प करत भोकरे दाम्पत्याने प्रचाराला औपचारिक सुरुवात केल्याने प्रभागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.