मोठी बातमी! संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेतील ‘या’ लाभार्थींना आता दरमहा मिळणार २५०० रुपये;

0
maharashtra-mantralaya-1200.jpg

सोलापूर : राज्यातील संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ, विधवा व दिव्यांग निवृत्तिवेतन योजनांतील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने अनुदानात तब्बल एक हजार रुपयांची वाढ केली असून, यामुळे लाभार्थ्यांना आता दरमहा १५०० ऐवजी २५०० रुपये मिळणार आहेत. हा निर्णय ऑक्टोबरपासून लागू होणार आहे.

राज्यातील विविध दिव्यांग कल्याण संघटना व लोकप्रतिनिधींच्या मागणीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी फक्त १००० रुपये अनुदान असले, त्यात काही वर्षांपूर्वी ५०० रुपयांची वाढ करण्यात आली होती. मात्र तुटपुंजी रक्कम जीवन जगण्यासाठी अपुरी ठरत असल्याने दिव्यांग लाभार्थ्यांमध्ये नाराजी होती. अखेर सरकारने घेतलेल्या नव्या निर्णयामुळे त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सोलापूर जिल्ह्यातील पावणेदोन लाखांपर्यंत लाभार्थ्यांपैकी आठ ते नऊ हजार दिव्यांग लाभार्थ्यांना या वाढीचा थेट फायदा होणार आहे. “आता दिव्यांग लाभार्थींना दरमहा अडीच हजार रुपयांचा लाभ मिळणार असून, या निर्णयामुळे त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न काही प्रमाणात सुटणार आहे,” असे तहसीलदार शिल्पा पाटील यांनी सांगितले.

निराधार योजनेकडे महिलांचा कल
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर संजय गांधी निराधार योजनेतील महिलांची संख्या काहीशी घटली होती. मात्र, वाढीव अनुदानामुळे पुन्हा महिलांचा कल निराधार योजनेकडे वाढू लागला आहे. दरमहा ५०० हून अधिक महिला या योजनेसाठी अर्ज करीत असून, काहींनी तर लाडकी बहीण योजना बंद करून निराधार योजनेचाच लाभ सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे दिव्यांग लाभार्थ्यांना आर्थिक आधार मिळणार असून, त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी मोठा हातभार लागणार आहे.


Spread the love

Leave a Reply