लाडक्या बहिणींनो लक्ष द्या! e-KYC अनिवार्य; नाही केले तर 1500 रुपयांचा लाभ थांबणार

मुंबई : राज्य सरकारच्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता योजनेतील सर्व पात्र लाभार्थी महिलांनी e-KYC अनिवार्यपणे करणे आवश्यक आहे. अन्यथा, या योजनेतून दरमहा मिळणारे 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होणार नाहीत. यासंदर्भातील परिपत्रक शासनाने जाहीर केले आहे.
महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि आरोग्य तसेच सामाजिक सुधारणा लक्षात घेऊन ही योजना सुरू करण्यात आली. मात्र, अनेक अपात्र महिलाही या योजनेचा लाभ घेत असल्याचे प्रकार उघडकीस आल्याने सरकारने पडताळणीची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
शासन परिपत्रकानुसार, दरवर्षी जून महिन्यात लाभार्थ्यांनी Aadhaar Authentication द्वारे e-KYC पूर्ण करणे बंधनकारक असेल. यासाठी https://ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत पोर्टलवर सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. लाभार्थ्यांना ऑनलाईन पडताळणी कशी करावी, याचा Flowchart सुद्धा शासनाने प्रसिद्ध केला आहे.
महत्त्वाचे मुद्दे :
या वर्षापासून दरवर्षी जून महिन्यातील दोन महिन्यांच्या कालावधीत e-KYC करणे बंधनकारक.
दिलेल्या कालावधीत e-KYC न केल्यास लाभार्थ्यांना योजनेतील पुढील रक्कम मिळणार नाही.
फसवेगिरी टाळण्यासाठी Aadhaar Authentication अनिवार्य.
अधिकृत पोर्टलवरच e-KYC करावे; बनावट वेबसाईट्स किंवा लिंक्सपासून सावध राहावे.
योजनेच्या सुरुवातीपासून महिलांना थेट बँक खात्यातून लाभ मिळत असला तरी, आता खरी पात्रता सुनिश्चित करण्यासाठी e-KYC ही सक्तीची प्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांनी आजच पोर्टलवर जाऊन e-KYC पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे.
—