येरवड्यात पाळीव श्वानांचा वापर करून हल्ला: नागरिकांमध्ये भीतीचे सावट; पोलिस तपासात महत्त्वाचे धागेदोरे

पुणे : येरवडा आणि बाणेर भागात पाळीव श्वानांना अंगावर सोडून नागरिकांवर हल्ला करण्यात आल्याच्या दोन स्वतंत्र घटना समोर आल्या आहेत. या प्रकरणांमध्ये येरवडा आणि बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
येरवडा पोलीस ठाण्यात रमजान आमिन कुरेशी (वय ३२, रा. नागपूर चाळ, येरवडा) यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून बॉबी डाडर (वय ३०) आणि यश डाडर (वय २८, दोघेही रा. एअरपोर्ट रोड, नागपूर चाळ, येरवडा) या आरोपींवर भारतीय दंड विधानाच्या कलम २९१, ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर चाळ पहिल्या गल्लीच्या तोंडावर रमजान कुरेशी चहा पीत उभे असताना आरोपींशी चेष्टा-मस्करी सुरू होती. चेष्टेमुळे झालेल्या वादातून बॉबी डाडरने कुरेशी यांच्या नाकावर बुक्का मारून त्यांना जखमी केले. त्यानंतर पाळीव कुत्र्याला अंगावर सोडल्याने कुत्र्याने कुरेशी यांच्या डाव्या मांडीचा चावा घेतला.
बॉबी डाडरने हत्यार घेऊन आरडाओरडा व शिवीगाळ करत कुरेशी यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.