महाराष्ट्र हाउसिंग बोर्डमधील आधार केंद्रात सरकारी वेळ सकाळी 10 ते 6; प्रत्यक्षात आधार केंद्र चारलाच बंद!
पुणे, २७ डिसेंबर (प्रतिनिधी) – “आधार सर्वांसाठी” अशी घोषणा करणाऱ्या यंत्रणाच पुण्यातील येरवडा येथील महाराष्ट्र हाउसिंग बोर्डमधील आधार नोंदणी केंद्रात मात्र नागरिकांचा आधारच काढून घेत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.
सकाळी सात ते संध्याकाळी पाच अशी अधिकृत कार्यालयीन वेळ असताना, येथे कार्यरत ऑपरेटर चार वाजताच हात वर करत असल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे. “आम्हाला हिशोब द्यायचा असतो, पाच नंतर कशाला काम करायचं?” अशी उद्धट उत्तरे देत नागरिकांना हाकलून लावले जात असल्याचा आरोप आहे.
विशेष म्हणजे, दुपारनंतर मात्र काही ‘ओळखीचे चेहरे’ आणि ई-सेवा केंद्र चालकांसाठी आधार अपडेटची कामे सर्रास सुरू असल्याचे दिसून येत आहे. सामान्य नागरिक रांगेत ताटकळत असताना, मागच्या दाराने होणाऱ्या कामकाजामुळे ‘आधार केंद्र की दलाली केंद्र?’ असा सवाल उपस्थित केला जात आहे.
या मनमानी कारभारामुळे नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत असून, सरकारी कार्यालयातील शिस्त कुठे गेली? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. आधारसारख्या अत्यावश्यक सेवेत असा अनागोंदी कारभार सुरू असेल, तर प्रशासन नेमके झोपले आहे का, असा टोमणाही नागरिकांकडून लगावला जात आहे.
या गंभीर प्रकाराची तातडीने सखोल चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यांवर कठोर शिस्तभंग कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालय व यूआयडीएआय (UIDAI) कडे लेखी स्वरूपात केली आहे. अन्यथा, आंदोलनाचा मार्ग अवलंबण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
—