ससून रुग्णालयात पुन्हा निष्काळजीपणाचा बळी? प्रसूतिदरम्यान तरुणीचा मृत्यू; कुटुंबाचा संताप उसळला
पुणे | “प्रसूतीच्या वेदनांमधून थेट मृत्यूकडे… ससूनच्या निष्काळजीपणाने आमची मुलगी हिरावली,” अश्रू ढाळत कुटुंबीयांनी आपला संताप व्यक्त केला. आई होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या २३ वर्षीय तरुणीचा ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने कुटुंब हतबल झाले आहे.
पहा व्हिडिओ
२५ नोव्हेंबर – रुग्णालयात दाखल, सुरक्षिततेची आशा
तब्येत बिघडल्याने तरुणीला २५ नोव्हेंबर रोजी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. “सरकारी रुग्णालय आहे, अनुभवी डॉक्टर असतील… आमचं मूल सुरक्षित हातात आहे,” अशी खात्री कुटुंबीयांना होती. मात्र काही तासांतच हे विश्वासाचे ढग कोसळून पडले.
२६ नोव्हेंबर – वेदनादायक प्रसूती, रक्तस्त्रावाकडे दुर्लक्ष?
२६ नोव्हेंबर रोजी तरुणीची प्रसूती करण्यात आली. या वेळी ती प्रचंड वेदनेत होती, रक्तस्त्रावही सुरू झाला होता, पण डॉक्टरांनी परिस्थिती गंभीरपणे घेतली नाही, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
कुटुंबीयांनी वारंवार सिझेरियनची विनंती केली; मात्र “कोणीही ऐकून घेतलं नाही,” असं ते सांगतात.
अनुभवी डॉक्टर नसताना इंटर्नकडून उपचार?
कुटुंबीयांनी गंभीर आरोप करत सांगितले की, महत्त्वाच्या क्षणी अनुभवी डॉक्टर अनुपस्थित होते आणि इंटर्नकडून प्रक्रिया करवून घेतली गेली. मुलीची प्रकृती हाताबाहेर जात असताना कोणत्याही वरिष्ठ डॉक्टरांनी पुढाकार घेतला नाही, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.
२७ नोव्हेंबर – उपचारादरम्यान मृत्यू
२७ नोव्हेंबर रोजी तरुणीने अखेर जीव गमावला. डॉक्टरांनी मृत्यूची माहिती दिल्यानंतर संपूर्ण परिवार कोसळून पडला.
“आमच्या निरपराध मुलीने काय चूक केली? तिचे प्राण कोणी घेतले?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
दहाव्या दिवशी उसळलेले प्रश्न आणि आक्रोश
दहाव्या विधीच्या दिवशी कुटुंबीयांनी सर्व नातेवाईकांसमोर घडलेली घटना सविस्तर सांगत अश्रू अनावर केले. “योग्य उपचार, प्रेम आणि काळजी मिळाली असती तर आमची मुलगी आज जिवंत असती,” असा आरोप त्यांनी केला.
कुटुंबीयांनी रुग्णालय प्रशासनावर कठोर कारवाईची मागणी केली असून, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
ससून रुग्णालयाकडून मात्र या आरोपांबाबत अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.