पुण्यात वायू प्रदूषणामुळे अॅलर्जीच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ

0
bengaluru-high-rise-residents.webp

तज्ज्ञांचा इशारा : सूक्ष्म धुळीचे कण फुप्फुसात शिरत असून श्वसनविकार, डोळ्यांचे त्रास वाढले

पुणे, दि. ३० ऑक्टोबर : पुण्यातील बदलत्या हवामानासोबत वाढत्या वायू प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून अॅलर्जीच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दिवाळीनंतर अचानक वाढलेली उष्णता, त्यानंतरचा पाऊस आणि वातावरणातील धुळीचे प्रमाण यामुळे श्वसनविकार, सर्दी, डोळ्यांचे विकार आणि अॅलर्जीच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली आहे.

वैद्यकीय तज्ज्ञांच्या माहितीनुसार, हवेतील सूक्ष्म धुळीचे कण फुप्फुसात शिरून शिंका येणे, नाक बंद होणे, नाकातून पाणी येणे, डोळे लाल होणे यांसारख्या समस्यांना कारणीभूत ठरत आहेत. विशेषतः दुचाकीस्वार आणि रस्त्यावर काम करणाऱ्या नागरिकांमध्ये या त्रासाचे प्रमाण अधिक आढळते.

डॉ. तेजसी मोदी (कान-नाक-घसा तज्ज्ञ) म्हणाल्या, “ऋतू बदलल्यावर अॅलर्जीच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ दिसून येते. वेळेवर उपचार न घेतल्यास हा त्रास दीर्घकाळ टिकू शकतो.” तर नेत्रतज्ज्ञ डॉ. नितीन पवार यांनी सांगितले, “लहान मुलांमध्ये डोळ्यांना खाज येणे, लाल होणे अशा तक्रारी वाढल्या आहेत. ऑक्टोबर ते मार्च या काळात सुमारे ६० ते ७० टक्के रुग्ण अॅलर्जीशी संबंधित तक्रारींसह डॉक्टरांकडे येतात.”

तज्ज्ञांनी नागरिकांना काही सोपे पण आवश्यक उपाय सुचवले आहेत —

  • बाहेर जाताना मास्कचा वापर करावा
  • दुचाकी चालवताना हेल्मेट घालावे
  • धुळीच्या ठिकाणी जाणे टाळावे
  • डोळ्यांना खाज आल्यास चोळू नये
  • आणि अस्थमा किंवा श्वसन विकार असणाऱ्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

तज्ज्ञांचे मत आहे की, नियमित मास्कचा वापर, घरातील स्वच्छता आणि वेळेवर वैद्यकीय सल्ला घेतल्यास अॅलर्जीचा त्रास मोठ्या प्रमाणावर कमी होऊ शकतो.

शहरातील प्रदूषणाचा परिणाम आता फक्त वायुप्रदूषणापुरता मर्यादित न राहता आरोग्याच्या विविध अंगांवर होत असल्याने नागरिकांनी सजग राहणे आणि काळजी घेणे अत्यावश्यक असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.

Spread the love

Leave a Reply

You may have missed