पुण्यात एलपीजी गॅस सिलिंडरचा पुरेसा साठा; अफवांवर विश्वास ठेवू नका — जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आवाहन
पुणे | प्रतिनिधी
मध्यपूर्वेतील तणावपूर्ण परिस्थिती आणि अमेरिका-इस्त्रायल-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशभरात एलपीजी गॅस सिलिंडरच्या पुरवठ्याबाबत विविध चर्चा सुरू आहेत. काही ठिकाणी गॅस सिलिंडर टंचाईच्या अफवाही पसरवल्या जात असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी डुडी यांनी स्पष्ट केले की, पुणे जिल्ह्यात घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून पुरवठा नियमितपणे सुरू आहे. जिल्ह्यातील सर्व एलपीजी वितरक तसेच तेल कंपन्यांकडून प्राप्त माहितीनुसार नागरिकांना गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीतपणे होत आहे आणि कोणतीही टंचाई निर्माण झालेली नाही.
दरम्यान, जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पुरवठा विभागाकडून सर्व गॅस एजन्सींवर सातत्याने देखरेख ठेवली जात आहे. त्यासाठी जिल्हास्तरीय फिरती आणि दक्षता पथके नियुक्त करण्यात आली आहेत. ही पथके गॅस वितरकांच्या कामकाजावर लक्ष ठेवत आहेत.
कोणत्याही वितरकाकडून कृत्रिम टंचाई निर्माण करणे, जादा दराने गॅस विक्री करणे किंवा अन्य अनियमितता आढळल्यास संबंधितांविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
नागरिकांनी घाबरून जादा सिलिंडर साठवण्याचा प्रयत्न करू नये आणि गॅस पुरवठ्याबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवांकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.