दोन अल्पवयीन मुलींच्या विनयभंगाचा आरोपी जामिनावर सुटताच पीडितांच्या घरासमोर मिरवणूक; उल्हासनगरात पुन्हा दहशतीचे वातावरण – व्हिडिओ व्हायरल

0
n6734507031753165141688e9443613bfb68137188aa2b58ecf07dd0eaf89ad33abfc4a67ca28ab1163a673.jpg



प्रतिनिधी | उल्हासनगर

दोन अल्पवयीन मुलींच्या विनयभंग प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपीने जामिनावर सुटका मिळताच थेट पीडितांच्या घरासमोर मिरवणूक काढत पुन्हा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. उल्हासनगरच्या रमाबाई टेकडी परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी आरोपीसह त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्यात २७ तारखेला मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास काही तरुणांनी एका घरात जबरदस्तीने घुसून एका तरुणाला मारहाण केली होती. त्याच प्रकरणात दुसऱ्या दिवशी रोहित झा, त्याचा भाऊ सोनमनी झा आणि त्यांच्या साथीदारांनी धारदार शस्त्र घेऊन पुन्हा त्या घरात प्रवेश केला. यावेळी घरात असलेल्या दोन अल्पवयीन मुलींना ओढून बाहेर काढत त्यांचा विनयभंग केला. शेजाऱ्यांच्या मदतीने आरोपींना पकडून चोप देण्यात आला होता. या घटनेनंतर दोन्ही बाजूंनी तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या.

पहा व्हिडिओ

या प्रकरणातील आरोपी रोहित झा याला दोन दिवसांपूर्वी कल्याणच्या आधारवाडी कारागृहातून जामिनावर सुटका झाली. सुटकेनंतर तो थेट रमाबाई टेकडी परिसरात आला आणि त्याच्या समर्थकांसह ढोल-ताशे आणि फटाक्यांच्या गजरात मिरवणूक काढली. विशेष म्हणजे ही मिरवणूक थेट पीडित कुटुंबाच्या घरासमोरून काढण्यात आली.

या प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांच्या नेतृत्वात रोहित झा, आशिष झा, अब्दुल खान, आरिफ सैय्यद यांच्यासह नऊ जणांविरोधात दहशत निर्माण करण्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दरम्यान, परिमंडळ चारमध्ये गेल्या काही महिन्यांत हत्या, गोळीबार, घरफोडी, दहशत माजवणे यासारख्या घटना वाढत चालल्या आहेत. पोलिसांचा धाक उरलेला नाही, अशी प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे. त्यामुळे अशा गुन्हेगारांविरोधात तातडीने कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. तसेच पीडित कुटुंबाला पोलिसांकडून संरक्षण देण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

Spread the love

Leave a Reply

You may have missed