अभाविपचा ‘भीक मागो’ आंदोलनातून विद्यापीठावर हल्लाबोल; विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफीचा दिलासा कधी?

0
n6855099341760774010001eccb2855afff167fe40efde63f4f4286470154cfc8ec3cd56efb4188b0e19fa8.jpg

पुणे, प्रतिनिधी: अतिवृष्टीमुळे आधीच हतबल झालेल्या विद्यार्थ्यांवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जणू आर्थिक गदा टाकल्याची स्थिती आहे. राज्य सरकारने परीक्षा शुल्क माफीची घोषणा करून विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला असतानाच, पुणे विद्यापीठाने मात्र २० टक्के शुल्कवाढ करून “शैक्षणिक दिवाळी”च विद्यार्थ्यांच्या हाती दिली आहे.

याच पार्श्वभूमीवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) नाशिक महानगर शाखेने विद्यापीठ कुलगुरूविरुद्ध ‘भीक मागो’ आंदोलन छेडले. बाजारपेठेत कुलगुरूंसाठी प्रतीकात्मक भीक मागत विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या प्रशासनाचा निषेध केला. विद्यार्थ्यांच्या दु:खाकडे विद्यापीठाचे प्रशासन जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

अभाविप कार्यकर्त्यांच्या या अभिनव आंदोलनाने विद्यापीठ प्रशासनाचे लक्ष वेधले, आणि नाईलाजानेच का होईना, व्यवस्थापन परिषद सदस्य सागर वैद्य आणि सहाय्यक कुलसचिव यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केली. “उद्या बैठकीत निर्णय घेऊन परिपत्रक काढू,” असे आश्वासन दिले गेले, परंतु विद्यार्थ्यांना अशा आश्वासनांचीही आता सवय झाली आहे, असे स्पष्टपणे बोलले जात आहे.

पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहमंत्री मेघा शिरगावे यांनी टोमणा मारत म्हटले, “विद्यापीठ कुलगुरूंना विद्यार्थ्यांशी संवाद साधायला वेळ नाही, पण शुल्कवाढ करायला वेळ नक्की मिळतो. ज्यांच्या घरात पाणी शिरलं, शेतं वाहून गेली, त्या विद्यार्थ्यांकडून पैसे घेणं हे अमानुषपणाचं उदाहरण आहे.”

तर नाशिक महानगर मंत्री व्यंकटेश औसरकर यांनी इशारा दिला की, “उद्या सकारात्मक निर्णय न घेतल्यास अभाविप आणखी तीव्र आंदोलन करेल. सामान्य विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आम्ही शेवटपर्यंत लढू.”

अभाविपने स्पष्ट केले की, पुणे विद्यापीठाने विद्यार्थ्यांची दिवाळी गोड करायची असेल, तर तातडीने परीक्षा शुल्क माफी लागू करून भरलेले शुल्क परत करावे. अन्यथा विद्यापीठ प्रशासनाविरुद्ध “शैक्षणिक दिवाळखोरी”चा आरोप टाळता येणार नाही, असा इशारा संघटनेने दिला आहे.

Spread the love

Leave a Reply

You may have missed