महिला पत्रकाराला शिवीगाळ प्रकरण, वामन म्हात्रेंना अटक होणार?, अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला, नेमकं प्रकरण काय? – पाहा व्हिडिओ
मुंबई: बदलापूरमध्ये घडलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर आंदोलनादरम्यान एका महिला पत्रकाराबद्दल अश्लील भाषा वापरल्याप्रकरणी शिंदे गटाचे नेते वामन म्हात्रे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात वामन म्हात्रे यांनी अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, कल्याण न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला आहे, त्यामुळे त्यांना कधीही अटक होण्याची शक्यता आहे. यामुळे वामन म्हात्रे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
बदलापूरमधील एका शाळेत दोन शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार झाला होता. या घटनेच्या विरोधात नागरीकांनी रस्त्यावर उतरून निषेध आंदोलन केले होते. या आंदोलनाचे कव्हरेज करत असताना वामन म्हात्रे यांनी एका महिला पत्रकाराच्या विरोधात अश्लाघ्य भाषा वापरली होती. त्यानंतर संबंधित महिला पत्रकाराने म्हात्रे यांच्या विरोधात अत्याचार आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, म्हात्रे यांनी हे आरोप निराधार असल्याचे सांगितले होते.
पहा व्हिडिओ
या प्रकरणात आता न्यायालयाने वामन म्हात्रे यांना धक्का दिला आहे. त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे आता पोलीस वामन म्हात्रे यांना अटक करणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
घटना काय?
सकाळच्या एका महिला पत्रकाराने बदलापूर अत्याचार प्रकरणाचे वार्तांकन करत असताना वामन म्हात्रे यांनी तिच्या विरुद्ध “तू अशा बातम्या देत आहेस, जणू तुझ्यावरच बलात्कार झाला आहे,” अशा शब्दांचा वापर केला होता. या घटनेनंतर महिला पत्रकाराने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या विधानामुळे वामन म्हात्रे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे.
वामन म्हात्रे यांचे मत काय?
वामन म्हात्रे म्हणाले, “मी मोहिनी जाधवला काल आव्हान दिलं होतं की तिने तिच्या आई-वडिलांची शपथ घेऊन सांगावं की मी असं बोललो होतो. खरं तर आम्ही सर्व बदलापूरवासी पीडित मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत होतो, आणि मी त्या प्रयत्नांच्या आघाडीवर होतो.”
“मोहिनी जरी पत्रकार असली तरी ती मीनल मोरे, संगीता चेंदवणकर यांच्यासारख्या चार-पाच महिलांच्या ग्रुपमध्ये होती. त्या ग्रुपने शालेय प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्याचे आवाहन केले होते. परंतु, त्याऐवजी बाहेरून आंदोलक आले आणि त्यांनी तिथे दंगल घडवण्याचा प्रयत्न केला,” असे वामन म्हात्रे यांनी महिला पत्रकाराच्या आरोपावर प्रतिक्रिया दिली.