पुण्यात शिक्षण क्षेत्राला काळी छाया; राज्यात ८०० बोगस शाळा उघड – पुण्यातही ५१ शाळा अनधिकृत घोषित;

पुणे : राज्यात शिक्षण विभागाने केलेल्या तपासणीत तब्बल ८०० शाळा बोगस असल्याचे उघड झाले असून त्यापैकी १०० शाळांवर कायमची कुलूपबंदी करण्यात आली आहे. पुणे महापालिका व जिल्हा कार्यक्षेत्रात एकूण ५१ शाळा बोगस ठरवण्यात आल्या आहेत. मात्र, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, जिल्ह्यात १०० पेक्षा जास्त अनधिकृत शाळा असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या पार्श्वभूमीवर, शिक्षण विभागाने पालकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. आपल्या पाल्याचा शैक्षणिक प्रवास सुरक्षित ठेवण्यासाठी फसव्या संस्थाचालकांच्या गोड गप्पांना बळी न पडता शासनमान्यता असलेल्या शाळांमध्येच प्रवेश द्यावा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
अनधिकृत शाळांमुळे फक्त आर्थिक फसवणूकच होत नाही, तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्यही अंधारात जाते. त्यामुळेच शालेय शिक्षण आयुक्तांनी राज्यातील सर्व अनधिकृत शाळा तत्काळ बंद करून त्या विद्यार्थ्यांचे समायोजन मान्यताप्राप्त शाळांमध्ये करण्याचे आदेश संबंधित विभागांना दिले आहेत.
शाळा प्रवेशापूर्वी ‘ही’ कागदपत्रे तपासा
पालकांनी प्रवेश घेताना खालील महत्त्वाची कागदपत्रे तपासावीत:
ना-हरकत प्रमाणपत्र
शिक्षण मंडळाचे मान्यता पत्र
राज्य शासनाचे इरादापत्र
यू-डायस नोंदणी क्रमांक (UID Portal)
ही कागदपत्रे तपासल्यास शाळा अधिकृत आहे की नाही, याची खात्री होऊ शकते. घर खरेदी करताना जशी कागदपत्रे तपासली जातात, तशीच प्रक्रिया मुलांच्या शाळेसाठीही आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
जिल्ह्यातील अनधिकृत शाळांचा तपशील :
पुणे जिल्हा कार्यक्षेत्र
अनधिकृत शाळा : ८
अनधिकृत इरादापत्र प्राप्त : ५
अनधिकृत स्थलांतरित शाळा : १५
पुणे महापालिका क्षेत्र
अनधिकृत शाळा : ९
अनधिकृत इरादापत्र प्राप्त : ५
अनधिकृत स्थलांतरित शाळा : ९
राज्यातील एकूण १३०० शाळांची तपासणी करण्यात आली असून त्यातील ८०० शाळांमध्ये गंभीर त्रुटी आढळल्या आहेत. पालकांनी अधिक माहिती यासाठी यू-डायस पोर्टलचा वापर करून शाळेची सत्यता तपासावी, असे आवाहनही शिक्षण विभागाने केले आहे.
—